Type to search

Featured जळगाव

नशिराबादजवळ अपघात; तरुण जागीच ठार

Share

जळगाव – 

राष्ट्रीय महामार्गावरुन रात्री दुचाकीवरून जात असताना साईडपट्टीवरून दुचाकी घसरून तरूण फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास नशिराबाद शिवारात घडली.

सिद्दीकी शेख हसन मनियार (36) रा.मनियार मोहल्ला, नशिराबाद असे मृत तरूणाचे नाव आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी ठिय्या आंदोलन केले. गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा घेतल्याने पेच निर्माण झाला होता. सिद्दीकी शेख हे गुरूवारी कामानिमित्त दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.एल.0273)ने जळगाव येथे आले होते.

काम आटोपल्यानंतर ते दुचाकीने महामार्गावरून नशिराबाद जाण्यास निघाले. सरस्वती फोर्डजवळ नवीन हायवेच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. नेमके या ठिकाणी साईडपट्टीवरून दुचाकी घसरून सिद्दीकी शेख हे गाडीवरून फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. घटनेची माहिती कळताच नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, हेड कॉन्स्टेबल प्रवीण ढाके, गुलाब माळी, राजेंद्र साळुंखे या कर्मचार्‍यांनी धाव घेतली.

त्यानंतर रूग्णवाहिकेतून तरूणाला जिल्हा शासकीय रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. शुक्रवारी सकाळी नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी रूग्णालयातही गर्दी केली होती. सिद्दीकी यांच्या पश्चात पत्नी अमिनाबी, मुले हसनेर, अबूबकर, वृद्ध आई खातुनबी शेख, भाऊ कासिम, शकिल तसेच अकिल असा परिवार आहे. नहीकडून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. पण त्या अनुषंगाने हवी तशी सुरक्षितता केल्याचे दिसत नाही.

कामादरम्यान सर्व्हिस रोड गरजेचा आहे. तसेच न करता अधिकारी जबाबदारी पार पाडत आहेत. जेव्हापासून काम सुरू झाले तेव्हापासून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. याला नहीचे अधिकारी, ठेकेदार हे जबाबदार आहेत, असा आरोप फारूक शेख यांनी रूग्णालयात केला. चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी महामार्गावर वाहनांसाठी उपाययोजना करणे गरजेचे होते. परंतु, तसे न करता नहीच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या मनमानीप्रमाणे कामाला सुरूवात केली. हायवे कुठेही खोदून ठेवला. खोल झालेल्या साईड पट्ट्यांकडे कानाडोळा करण्यात आला. यामुळे वाहनधारकांना मनस्ताप तर वाढला. परंतु, अपघाताच्या संख्येतही वाढ झाली. नहीने कामात पारदर्शकता आणावी, यासाठी 28 जानेवारी रोजी ग्रामस्थांनी बोळवण दिली होती. त्यानंतर 06 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक उत्तरकार्य करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु, त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे-थे’च आहे. त्यामुळे नही तसेच संबधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी सरपंच पंकज महाजन यांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!