मोपलवार पदच्युत, मेहतांची पाठराखण

0

मुंबई । दि.3 । प्रतिनिधी-भ्रष्टाचाराचे आरोप असलेले व समृद्धी महामार्गाची जबाबदारी पेलणारे राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना पदच्युत करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली. चौकशी होईलपर्यंत मोपलवार या पदावर काम करू शकणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्याचवेळी विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची मात्र जोरदार पाठराखण केली. जो निर्णय झालाच नाही व ज्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यासाठी मेहतांचा राजीनामा मागणे हे निव्वळ राजकारणच असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा राजीनामा आणि आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची हकालपट्टी या दोन मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आग्रह धरल्याने निर्माण झालेल्या गोंधळात विधानसभेचे कामकाज पाच वेळा तहकूब झाले व अखेरीस गोंधळातच समाप्त झाले.

आज सकाळी सभागृहाची बैठक प्रश्नोत्तरासाठी सुरु होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मेहता-मोपलवार यांच्या कथित भ्रष्टाचाराचा विषय काढला व दोघांनाही पदावरून दूर करण्याची मागणी लावून धरली.

विरोधी सदस्यांनी याबाबतचे बॅनरही फडकावले. त्याला प्रत्युत्तर म्हणून काल लातूर येथे काँग्रेसच्या एका महिला पदाधिकार्‍याला मानवी तस्करीप्रकरणी अटक झाल्याचा मुद्दा सत्तारूढ सदस्यांनी काढून काँग्रेसविरोधात घोषणाबाजी सुरु केली. यामुळे प्रचंड गदारोळ निर्माण होऊन विधानसभेचे कामकाज पाचवेळा तहकूब करावे लागले.

दुपारी साडे बारानंतर पुन्हा बैठक सुरु झाली तेंव्हा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जयंत पाटील यांनी पुन्हा तेच मुद्दे उपस्थित केले.

मोपलवार यांच्याविषयी केंद्र सरकारने पत्रे लिहिली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र पाठवले आहे. त्यांच्या बाबतीत सीबीआयने राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशी करायला सांगितले, असेही या पत्रव्यवहारावरून दिसते आहे.

तरीही सरकार त्यांना का पाठाशी घालत आहे? असा प्रश्न विखेंनी विचारला. मंत्री प्रकाश मेहता यांचे रोज नवनवे प्रताप पुढे येत आहेत तरीही करवाई का होत नाही? खडसेंना जो न्याय दिला तोच मेहतांना का नाही? असाही जाब सरकारला विचारला.

आयकर विभागाने पत्रे लिहिली. सीबीआयने पत्रे लिहिली तरी मोपलवारांची चौकशी का होत नाही? सात-सात महिने त्यांच्यावरील चौकशीचे अहवाल का येत नाहीत? असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.

विखे आणि पाटील यांच्या मुद्यांना उत्तर देण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उभे राहिले. पंतप्रधान मोदी भाजपचे आहेत आणि भ्रष्टाचार अजिबात खपवून न घेण्याची भाजपाची भूमिका आहे.

त्यामुळे त्यांनी आलेल्या तक्रारीची दखल घेऊन लगेच चौकशीचे आदेश दिले. आमचे अनिल गोटे यांनीही मोपलवारांच्या चौकशीची मागणी त्याचसाठी केलेली आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

एव्हाना मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात आले होते. त्यांनी मोपलवारांना पदावरून दूर करून एका महिन्यात चौकशी पूर्ण केली जाईल व ते दोषी असतील तर कारवाई देखील केली जाईल, असे सांगितले.

मोपलवार यांच्या विरोधात झालेल्या आरोपांची सारी प्रकरणे त्यांच्या आधीच्या कार्यकाळातील आहेत. तुमच्याच आघाडी सरकारने त्यांना विविध कार्यकारीपदांवर नेमले होते. समृद्धी महामार्गाचे काम करताना मोपलवारांवर कोणतेही आरोप झालेले नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेत याच विषयांवर झालेला गोंधळ व सभा तहकुबीनंतर केलेल्या निवेदनात मुख्यमत्र्यांनी विधानसभेतील मुद्यांचाच पुनरुच्चार केला.

 

 

LEAVE A REPLY

*