जळगाव जिल्ह्यात कोरोनानंतर नवीन संकट

jalgaon-digital
2 Min Read

राज्यशासनाने ‘सारी’ आजाराबाबत मागविली माहिती

पंकज पाचपोळ  – 

एकीकडे जगभर कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असतांनाच जळगाव जिल्ह्यात 16 दिवसांत 17 कोरोना संशयितांचा मृत्यू झाला आहे. यातील एक पॉझिटीव्ह वगळता इतरांचा मृत्यू हा श्वसनाच्या त्रास असल्याने झाल्याने जिल्ह्यातही सिव्हीअर एक्युट रिस्पायरेटरी इन्फेक्शन म्हणजेच सारी आजाराने झाला असल्याची शंका व्यक्त करण्यात येत असल्याने सारी बाबतचा अहवाल पाठविण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हा रुग्णालयाला दिले आहेत.

गेल्या 30 मार्च ते 15 एप्रिल या अवघ्या 16 दिवसांच्या कालावधीत याठिकाणी मृत्यू झालेल्यांमध्ये 9 पुरुष तर, 8 महिलांचा समावेश आहे. मृतात 60 वर्षांवरील 9 जणांचा समावेश आहे. तसेच 15 ते 60 या वयोगटातील 5 जण आहेत. 15 वर्षांखालील 3 जणांचाही मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे. या 17 मृतांमध्ये शहरातील सालारनगरातील रहिवासी असलेल्या 63 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. हा वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

या वृद्धाचा अपवाद वगळता 17 मृतांपैकी 13 जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले होते. परंतु, त्यांचा मृत्यू श्वसनाच्या विकाराने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरित 3 मृतांचे अहवाल अद्याप जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मिळालेले नाहीत.

दरम्यान, 13 जणांचा मृत्यू हा सारी आजाराने झाल्याची भीती आहे. सारी आजाराची लक्षणे ही कोरोना आजाराप्रमाणेच असतात. मात्र, हा आजार झालेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नसतो, असे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जळगावात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यानंतर जळगावात सातत्याने कोरोनासदृश्य आजाराचे संशयित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले.

कोरोना विषाणू पाठोपाठ मसारीफ आजारामुळे मृत्यू होणार्‍या रुग्णांची संख्या देशात व राज्यात झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयांना सारीचा प्रादुर्भाव झालेले रुग्ण व मृत्यू झालेल्यांचा अहवाल दररोज निर्धारित फॉरमॅटमध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गुरुवारपासून हा अहवाल पाठवण्यास सुरुवात झाली आहे,

डॉ.एन.एस.चव्हाण,
जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *