अन्याय झाल्याचे ‘त्यांच्या’ लक्षात आले असल्यास चांगली गोष्ट!

आ.एकनाथराव खडसे यांनी ‘देशदूत’जवळ व्यक्त केल्या भावना

0
जळगाव । “माझ्यावर अन्याय झाल्याचे ‘त्यांच्या’ लक्षात आले असल्यास ती चांगली गोष्ट आहे. आता त्याबाबत मी काय बोलणार? आपण आपले प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करत राहायचे,” अशा भावना राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांनी गुरुवारी ‘देशदूत’शी बोलताना व्यक्त केल्या.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात खडसेंवर अन्याय झाल्याची जाहीर कबुली दिली होती. खडसेंबद्दल आपल्याला आदर असून सहानुभूती वाटत असल्याचेही महाजन यांने म्हटले होते. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता नाथाभाऊंनी या भावना व्यक्त केल्या. आपण गेली चार दशके प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करीत आहोत. यापुढेही करीत राहणार. या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार अनुभवले तरीही आपण कधी डगमगलो नाही, असे खडसेंनी सांगितले.

खडसे यांच्या मंत्रिमंडळात समावेशाबाबत महाजन म्हणाले होते, की नाथाभाऊंनी स्वत: मला आता घेऊ नका, पुढच्या टर्मला घ्या, असे सांगितले होते. त्यावर खडसे म्हणाले, की मी स्वत: महाजन यांना कधीही या विषयात थेट समक्ष काही बोललेलो नाही. मात्र, एका जाहीर कार्यक्रमात मागे बोललो होतो, की कमी कालावधीसाठी मंत्रिमंडळात काही मला घेऊ नका. आचारसंहिता वैगेरे या सर्वात काम करायला पुरेसा वाव मिळत नसल्यामुळे आपल्याला त्यावेळी मंत्रिपदात काही इंटरेस्ट नव्हता, हे खरे आहे.

कोअर कमिटीमध्ये कायमच
खडसे यांना कोअर कमिटीतून वगळण्यात आल्याची चर्चा आज दिवसभर सोशल मीडियावर सुरु होती. त्यावर ही अफवाच असून त्यात तथ्य नसल्याचे खडसेंनी सांगितले. कुणीतरी शोध पत्रकाराने ही बातमी कुठूनतरी शोधून काढली, असा टोला त्यांनी लगावला. मी भाजपच्या कोअर कमिटी आणि पार्लियामेंटरी बोर्डातही आहे. मुंबईतील गुरुवारची बैठक ही कोअर कमिटीची नव्हती तर नियोजन समितीची होती. निवडणूक व इतर नियोजन अशा या समितीच्या दोन बैठका होत्या. मी गेलो नसलो तरी खासदार रक्षा खडसे या बैठकीत उपस्थित होत्या, असेही खडसे यांनी ‘देशदूत’शी बोलताना स्पष्ट केले. मी परवाच पार्लियामेंटरी बोर्डाची बैठक आटोपून परतलो होतो. गुरुवारी माझ्या मतदार संघात अनेक पूर्वनियोजित ठरलेले कार्यक्रम होते. या कार्यक्रमांना उपस्थित राहणे आवश्यक होते. त्यामुळे या नियोजन बैठकीला उपस्थित राहणार नाही, हे पक्षाला आधीच कळविलेले होते, असेही खडसे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*