बाजारपेठेत मंदीचे सावट

0
अमोल कासार,जळगाव । दि.28 । – गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्‍याला भरघोस उत्पन्न मिळाले होते. परंतू यंदा जून महिना उलटला तरी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शहरातील बाजारपेठेत मंदिचे सावट निर्माण झाले आहे.
तसेच येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास शेतकर्‍यांवरही दुबारपेरणीचे संकट ओढवणार आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात मान्सून दाखल झाला होता. सुरुवातीलाच मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे बाजारपेठमध्ये तेजी निर्माण झाली होती.

शेतकरी देखील आनंदीत होवून त्यांनी शेतात पेरणीला सुरुवात केली होती. जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्‍यांचे जून महिन्यातच पेरणीचे काम अंतिम टप्प्यात आले होते.

मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे. पाऊस लांबल्याचा विपरीत परीणाम बाजारपेठेवर देखिल पडला आहे.

येत्या काही दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास बाजारपेठेत मंदिची लाट येण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

पाऊस लांबणीवर पडल्यामुळे त्याचा परिणाम लहान उद्योग धंदे, शेतकरी, मजूर यासह मोठ्या व्यापार्‍यांवर मोठ्या प्रमाणात होत आहे.

जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होवून अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे व्यापार्‍यांकडून सांगण्यात आले.

उत्पन्न घटण्याची शक्यता
गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्‍याला चांगले उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.

महागाईचा भडका होणार
पावसाने दडी मारल्यामुळे बाजारपेठेत मालाचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किंमतीत वाढ होवून महागाईची झळ नागरिकांना सहन करावी लागणार आहे.

बाजारपेठेत शुकशुकाट
शहरातील दाणाबाजार हा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ समजली जाते. जिल्हाभरातून व्यापारी याठिकाणी मालाची खरेदी करण्यासाठी येत असतात. परंतू पावसाने हुलकावणी दिल्याने ऐरवी गर्दीने फुल्ल असलेल्या दाणाबाजारात शुकशुकाट पसरल्याचे चित्र आहे.

 

LEAVE A REPLY

*