Type to search

maharashtra जळगाव

रस्त्यांच्या 100 कोटीच्या कामांवर टांगती तलवार

Share
जळगाव । बहुचर्चित मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 100 कोटीचा निधी नगरोत्थान विभागांतर्गत शहर विकासासाठी मंजूर झाला आहे. मात्र 100 कोटीच्या रस्त्याच्या कामांसाठी तांत्रिक मान्यतेची 25 लाखाची फी देणे शक्य नसल्याने तसेच आगामी विधानसभा निवडणूक व आचारसंहितेमुळे टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे.

100 कोटीच्या कामे अधांतरीत
कुठलीही तांत्रिक मान्यतेची ‘फी’ न देता केवळ हमीपत्रावर एमजीपीने मान्यता दिलेली आहे. उर्वरित 50 कोटीची कामांना तांत्रिक मान्यता घेणे बाकी आहे. मात्र सर्व 100 कोटीच्या कामांसाठी तांत्रिक मान्यतेची फी 25 लाख मनपास एमजीपी व पीडब्लूडी विभागास देणे बंधनकारक आहे. ही ‘फी’ भरल्यानंतर पूर्ण 100 कोटीच्या रस्त्यांची कामे मनपास मार्गी लावता येतील. मात्र मनपास ही फी त्वरित देणे शक्य नाही. तसेच तांत्रिक मान्यतेस एमजीपीतर्फे लागणारा वेळ, आगामी विधानसभा निवडणुका व आचारसंहिता तसेच तोंडावर आलेला पावसाळा यामुळे रस्त्यांची कामे अधांतरीतच राहणार असल्याचे दिसून येत आहे.

तांत्रिक मान्यतेच्या ‘फी’ची मागणी
एमजीपी व पीडब्ल्यूडीतर्फे 100 कोटीच्या रस्त्यांच्या कामांसाठी लागणारी तांत्रिक मान्यतेची 25 लाखाची मागणी करण्यात येत आहे. ही फी भरल्याशिवाय तांत्रिक मान्यता मिळणार नाही. याबाबत मनपास नुकतेच एमजीपी व पीडब्ल्यूडीने कळविले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस. एस. भोळे यांनी याबाबत आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांची भेट घेवून त्यांच्याशी तांत्रिक मान्यतेची फी देण्याबाबत चर्चाही केली. तसेच आ.सुरेश भोळे यांचेशीही चर्चा केली आहे. मात्र तांत्रिक मान्यतेचे 25 लाख भरणे मनपास तूर्त शक्य नसल्याने रस्ते विकास कामांवर टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे.

50 कोटींच्या कामांना मंजुरी; राहिलेल्या 50 कोटींसाठी प्रयत्न
100 कोटीच्या रस्ते विकास कामांपैकी 50 कोटीच्या रस्त्याच्या कामांना एमजीपी (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हमीपत्रावर आधारित तांत्रिक मान्यता अगोदरच मिळालेली आहे. निदान ही तांत्रिक मान्यता मिळालेली कामे मार्गी लावण्याचा आमदार सुरेश भोळे यांचा प्रयत्न आहे. आचारसंहिता शिथिल झाली की तांत्रिक मान्यता मिळालेल्या 50 कोटीची कामे मार्गी लावू असेही आमदार भोळे यांनी आयुक्त डॉ.उदय टेकाळे आणि अभियंता भोळे यांच्याशी झालेल्या चर्चेत सांगितले. किमान ही कामे तरी सुरू होवून मार्गी लागतील असे त्यांचे म्हणणे आहे. उर्वरीत 50 कोटींच्या कामांसाठी पाठपुरावासुध्दा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नागरिकांना केवळ प्रतीक्षाच
100 कोटीतून शहर विकासासाठी रस्त्यांची कामे होत असल्याने शहरवासीय गेल्या अनेक दिवसापासून समाधान व्यक्त करीत असले तरी ही केवळ प्रतीक्षाच असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याची कामे अजूनही 4 महिने तरी होणार नसल्याचे एकूणच चित्र असल्याचे दिसून येत आहे.

‘फी’ भरण्याच्या हालचाली सुरु
दरम्यान मनपातर्फे विकासकामे होणे महत्वाचे असल्याने 100 कोटीच्या रस्त्यांसाठी 25 लाखाची फी देण्याबाबत सकारात्मक चर्चेच्या दृष्टीने पावले पडत असून आयुक्त डॉ.टेकाळे, आमदार सुरेश भोळे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस. एस. भोळे हे बैठकीत घेणार आहेत. रस्ते होणे महत्वाचे असल्याने 25 लाखाची तरतूद करावीच लागणार आहे. मात्र विकासकामे थांबली नको पाहिजे असाही सूर संबंधित वरिष्ठ पदाधिकार्‍यांचा आहे. त्या दृष्टीने पावलेही उचलण्यात येतील. याकामी थोडा उशीरही लागू शकतो मात्र काम होणे गरजेचे आहे. फी बाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागालाही लवकरच कळविले जाणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!