डमी उमेदवारालाही पक्षाचा एबी फॉर्म देणार!

0
जळगाव । महापालिका निवडणुकीत उमेदवारी देतांना उमेदवाराप्रमाणे एक डमी उमेदवार देऊन त्याला देखिल पक्षाचा एबी फॉर्म देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आज घेण्यात आला. दरम्यान डॅमेज कंट्रोलसाठी राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नगरसेवक भाजपात तर पक्षाचा महानगराध्यक्ष शिवसेनेत दाखल झाल्याने राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला. पक्षाला अधिक नुकसान पोहचू नये म्हणून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालयात पार पडली.

यावेळी निरीक्षक रंगनाथ काळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खा. अ‍ॅड. वसंतराव मोरे, ईश्वरलाल जैन, माजी आ. दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, अल्पसंख्यांकचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड. रविंद्र पाटील, ज्ञानेश्वर महाजन, अनिल पाटील, माजी आ. अरूण पाटील, जि.प.सदस्य रविंद्र पाटील, सोपान पाटील, खलील देशमुख, भुसावळचे नगरसेवक उमेश नेमाडे, अ‍ॅड. सचिन पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष विजया पाटील, सरचिटणीस मंगला पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, शहराध्यक्ष नीला चौधरी, युवती प्रमुख कल्पीता पाटील, प्रतिभा शिरसाठ, राजेश पाटील, विशाल देवकर, अरविंद मानकरी, नामदेव चौधरी, विलास पाटील, राजेश पाटील, योगश देसले, सविता बोरसे, मनिषा देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत नगरसेवकांची शिरगणती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा बैठकीला 11 पैकी पाच नगरसेवक भाजपात गेल्यानंतर उर्वरीत सहा पैकी चार नगरसेवकांनी हजेरी लावली. या चारही नगरसेवकांची शिरगणती करण्यात आली. त्यात नगरसेविका अश्विनी देशमुख, दिपाली पाटील यांचे पती दुर्गेश पाटील, स्विकृत नगरसेविका लता मोरे, रविंद्र मोरे या चार नगरसेवकांनी उभे राहुन आम्ही राष्ट्रवादी सोबतच राहणार असल्याची ग्वाही दिली.

पक्षातून बेईमान गेल्याचा आनंद – जैन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जे गेले ते बेईमान होते. पक्षातून बेईमान गेल्याचा आनंद असल्याचे मत माजी खा. ईश्वरलाल जैन यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, गेले ते कावळे आणि राहीले ते मावळे. आपण शिवरायांचे वंशज आहोत. गनिमीकाव्याने आता महापालिकेची निवडणूक लढून ती जिंकू. तसेच भाजपा आणि खाविआची युती अशक्य असल्याचेही माजी खा. जैन यांनी सांगितले.

नेत्यांवर प्रभागांची जबाबदारी
महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्हा पदाधिकारी, माजी आमदार, माजी खासदार यांच्यावर प्रभागांची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय देखील राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आला.

LEAVE A REPLY

*