Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

जळगाव येथे डोळ्यादेखत कोर्टचौकातील 31 दुकाने जमीनदोस्त

Share
जळगाव । शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण निर्मुलनाची महानगरपालिकेने मोहिम राबविली. एकाचवेळी पाचही रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली. कोर्ट चौकातील दुकाने जेसीबीने तोडण्याचा प्रयत्न करताच दुकानदारांनी प्रचंड घोषणाबाजी करुन विरोध केला. अक्षरश: दुकानदार जेसीबीसमोर बसून ‘आमच्या रोजीरोटीवर जेसीबी चालवू नका’ अशी आर्त हाक देत, जेसीबीसमोर परिवारासह जीव देवू असा इशारा देताच पोलीसांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने अगदी अर्ध्यातासात 31 दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. डोळ्या देखत दुकाने पाडत असतांना दुकानदारांच्या डोळ्यातील अश्रू तराळत होते.

शहरातील मुख्यरस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आयुक्त चंद्रकांत डांगे आणि पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे यांनी पाहणी केली. त्यानुसार नगररचना विभागाला कोर्ट चौक ते टॉवर चौक, बळीरामपेठ ते भिलपुरा चौक, घाणेकर चौक ते सुभाष चौक, रथचौक, सुभाष चौक ते बेंडाळे चौक, पांडे चौक, बेंडाळे चौक ते चित्रा चौक, सुभाष चौक, चित्रा चौक ते कोर्टचौक, चित्रा चौक ते टॉवर चौकपर्यंत रस्त्यांची मार्किंग केली. त्यानुसार आजपासुन अतिक्रमण निर्मुलनाच्या कारवाईला सुरुवात करण्यत आली आहे. शहरातील पाचही प्रमुख रस्त्यांवर सकाळी 11 वाजेपासुन अतिक्रमण निष्काशीत करण्यात आले.

कोर्टचौकातील दुकानदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात
महानगरपालिकेचे पथक कोर्टचौकात कारवाई पोहचल्यानंतर येथील दुकानदारांनी जेसीबीसमोर बसून प्रचंड विरोध केला. बंद करो…. बंद करो… हुकूमशाही बंद करो…. अशा घोषणा देवून दुकानदार विरोध करत होते. कारवाई दुकानदारांनी जेसीबीवर चढून जीव देण्याचा इशारा दिला. दुकानारांचा आक्रोश वाढत असतांना आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे यांना फोन केला. त्यानंतर पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे आणि अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव त्याठिकाणी आले. पोलीसांनी वाद घालणार्‍या आणि कारवाईला विरोध करणार्‍या दुकानदारांना ताब्यात घेतल्यानंतर अगदी अर्ध्यातासात 31 दुकाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आलीत.

पोटावर नका मारु हो!
कोर्टचौकात दुकानांवर अतिक्रमणाची कारवाई करतांना दुकानदारांसह त्यांच्या परिवारांनी विरोध केला. आमची रोजीरोटी आहे, पोटावर मारु नका हो, आम्ही जगायचे कसे अशी आर्त हाक दुकानदारांनी दिली. मात्र प्रशासनाने केवळ अर्ध्यातासातच डोळ्यासमोर दुकाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. त्यामुळे दुकानदारांच्या डोळ्यात अश्रु तराळत होते.

मनपा कर्मचारी आणि दुकानदारांमध्ये वाद
अतिक्रमण निर्मुलनाच्या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेचे कर्मचारी आणि दुकानदारांमध्ये शाब्दीक वाद झाला. कोर्टचौकात एका दुकानदाराने कर्मचार्‍याची कॉलर पकडली होती. वाद वाढत असतांना आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी वाद मिटवून शांततेत करण्याची सूचना दिली. त्यानंतर काँग्रेस भवनसमोर, भवानीपेठ, नेहरु चौकात देखील वाद झाला.

पथकातील 19 कर्मचारी गैरहजर
अतिक्रमण निर्मुलन मोहिमेसाठी 208 कर्मचार्‍यांची नेमणूक करुन पथक तयार करण्यात आले होते. सर्व कर्मचार्‍यांना कारवाईवेळी हजर राहण्याची सूचना दिली होती. सकाळी उपायुक्तांनी हजेरी घेतली. 208 कर्मचार्‍यांपैकी 189 कर्मचारी हजर होते. तर 19 कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे गैरहजर कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला.

न्यायालयात जाणार!
तीन राज्यात झालेल्या पराभवामुळे भाजपाचे सत्ताधारी अस्वस्थ झाले आहे. प्रशासनाला हाताशी धरुन काँग्रेस भवनासमोरील अतिक्रमण काढल्याप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी दिला.

अतिक्रमण कारवाईदरम्यान आ.राजूमामा भोळे यांचा हस्तक्षेप
भवानीपेठेत महानगरपालिकेचे पथक अतिक्रमणाची कारवाई करित असतांना व्यापार्‍यांनी विरोध केला. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता आ.राजूमामा भोळे त्याठिकाणी येवून कारवाईला विरोध केला.अतिक्रमण असल्याचे कारण देवून अधिकारी दुकाने तोडत आहेत. महानगरपालिकेच्या वरच्या मजल्यांना तरी परवानगी आहे का? आयुक्त देखील परवानगी नसलेल्या 13 व्या मजल्यावर बसतात. हा कुठला न्याय? अशा शब्दात आ.भोळे यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर त्याठिकाणी आयुक्त चंद्रकांत डांगे, पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे, तहसीलदार अमोल निकम हे देखील आले. आ.राजूमामा भोळे यांनी विरोध केल्याचे सांगताच आयुक्तांनी दुकानांसमोरील सर्व शेड तोडण्याचे आदेश दिले.

370 पोलिसांचा बंदोबस्त
अतिक्रमणाच्या कारवाईसाठी जिल्हाभरातुन पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. 370 पोलीसांचा बंदोबस्त होता. परंतु काही ठिकाणी वाद सुरु असतांनाही पोलीसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे पोलीसांच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते.

13 वर्षानंतर अतिक्रमणाची मोठी कारवाई
शहरात तत्कालीन मनपा आयुक्त डी.पी.मेतके, संजय काकडे यांच्यानंतर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी एकाचवेळी पाच रस्त्यांवर अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई केली. 13 वर्षानंतर शहरात अतिक्रमणाची मोठी कारवाई होत असल्याची चर्चा रंगत होती.

अधिकार्‍यांकडून पाहणी
शहरात एकाचवेळी पाचही रस्त्यांवर अतिक्रमणाच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. आयुक्त चंद्रकांत डांगे, पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, तहसीलदार अमोल निकम, आरटीओ निरीक्षक शिरसाठ, उपायुक्त चंद्रकांत खोसे, लक्ष्मीकांत कहार, अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान यांनी कारवाई सुरु असतांना भेट देवून पाहणी केली.

दुकानांचे ओटे, शेड तोडले
कोर्ट चौक ते टॉवर चौक, बळीरामपेठ ते भिलपुरा चौक, घाणेकर चौक ते सुभाष चौक, रथचौक, सुभाष चौक ते बेंडाळे चौक, पांडे चौक, बेंडाळे चौक ते चित्रा चौक, सुभाष चौक, चित्रा चौक ते कोर्टचौक, चित्रा चौक ते टॉवर चौकापर्यंत पाचही रस्त्यांवर एकाचवेळी अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. मार्किंगनुसार दुकानांचे ओटे, शेड देखील तोडण्यात आले.

आयुक्तांचा हिरोगिरी करण्याचा प्रयत्नआ. भोळे
जळगाव । मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या बदलीसंदर्भात गेल्या काही दिवसांपासुन चर्चा सुरु आहे. अतिक्रमणाची कारवाई करुन हिरोगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप आ.राजूमामा भोळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

शहरात अतिक्रमणाची कारवाई करतांना नोटीस देवून कारवाई करायला हवी होती. किंवा महासभेची मंजुरी घेणे आवश्यक होते. परंतु तसे न करता आयुक्तांनी कारवाई सुरु केली. बांधकाम चूकीचे असेल तर ते जरुर काढावे, परंतु विनाकारण गोरगरीबांना त्रास देवू नये, अशी आमची भूमिका असल्याचे आ.भोळे यांनी सांगितले. कोर्टचौकातील दुकाने महासभेत ठराव केल्यानंतर शासनाच्या पैश्यातुन बांधण्यात आले आहे.

मग ते बेकायदेशीर कसे असू शकतात, असा सवाल देखील आ.भोळे यांनी उपस्थित केला. भूसंपादनाच्या विषयावरुन प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी असल्यामुळे आयुक्तांच्या जिव्हारी लागली. त्यामुळेच अतिक्रमण कारवाईचा अतिउत्साहीपणा दाखवित असल्याची टिका देखील केली.

अतिक्रमण काढण्यासाठी जी तत्परता दाखविण्यात येत आहे. तेवढीच तत्परता मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत आयुक्त का दाखवित नाहीत? खान्देश मिलमध्ये विनापरवानगी बांधकाम सुरु आहे. त्यावर आयुक्त का कारवाई करित नाही? असा सवाल आ.भोळे यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेस स्थायी सभापती जितेंद्र मराठे, गटनेते भगत बालानी, विशाल त्रिपाठी, दीपक सुर्यवंशी, आबा कापसे, अ‍ॅड.बबन पोकळे उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!