…बोलाचाच भात!

0
नाशिक येथे आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय आहे. राज्यातील करोडो आदिवासींच्या विकासासाठी येथील आदिवासी आयुक्तालय अहोरात्र झटते (?) असे नेहमी सांगितले जाते. याच मुख्यालयाच्या पुढाकाराने सालबादप्रमाणे नुकताच ‘आदिवासी दिन’ साजरा झाला.

तो साजरा करण्यासाठी आदिवासी विभागाकडून घरचेच कार्य समजून ‘होऊद्या सढळपणे खर्च’ ही भूमिका उदारपणे अंगीकारली जाते. तोच शिरस्ता यंदाही पाळला गेला. मात्र, ज्यांनी न चुकता हजर राहण्याची अपेक्षा होती, त्या लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. जणू अघोषित बहिष्कारच टाकला. आदिवासी विकासमंत्र्यांनीही कार्यक्रमास दांडी मारली. एरव्ही फुटकळ कार्यक्रमांत स्वत:ची नृत्यकला दाखवणारे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच खासदार-आमदारही तिकडे फिरकले नाहीत.

अखेर जिल्हा परिषद अध्यक्षा आणि महापौरांना शोधून आणण्यात आले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. कसाबसा कार्यक्रम उरकला. आदिवासींच्या विकासासाठी सरकारी पातळीवर किती मोठ्ठे काम चालू आहे? दरवर्षी कोट्यवधींचा निधी कसा खर्च केला जातो? याबद्दल सांगताना सरकार, मंत्री व लोकप्रतिनिधींच्या उत्साहाला उधाण येते. आदिवासींचे किती भले झाले याबद्दल वृत्तपत्रे नेहमी शंका प्रदर्शित करतात.

तथापि आदिवासींमुळे अनेकांच्या भरलेल्या पोटाची सोय होते. दोन घास अधिक जातात. हे कोण नाकारेल? तरीही आदिवासींबाबत लोकप्रतिनिधींनी एवढी अनास्था का दाखवावी? सरकारी पातळीवर त्यांच्यासाठी बरीच धावाधाव होते. तरी प्रत्यक्षात आदिवासी बिचारा आहे तिथेच आहे. त्यांच्या मुलांना शाळेतील कपडेसुद्धा कधीतरी मिळतात. आदिवासी भागातील बाल आणि महिला कुपोषणाचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. बालमृत्यू वाढतच आहेत. सरकार पाण्यासारखा पैसा खर्च करते. तो कोणत्या पाटाने वाहून जातो? हा संशोधनाचा विषय आहे.

आदिवासी विकास महामंडळाकडेही सरकार पोरकेपणाने का पाहते? गेल्या दहा महिन्यांत महामंडळाची एकही बैठक झाली नाही, असे बोलले जाते. आदिवासी विकासमंत्री या महामंडळाचे अध्यक्ष आहेत. मात्र, बैठकीसाठी त्यांना सवडच मिळू नये इतके ते कुठे व्यस्त असतात, असाही प्रश्न आदिवासी विचारतात. त्यांच्यासाठी जाहीर झालेल्या कुठल्याही विकास योजनेत सावळागोंधळ नाही अशी स्थिती नाही.

एकूणच आदिवासींबद्दल दिसणारी लोकप्रतिनिधींची उदासीनता आकस्मिक नाही. नेहमीच बहुतेक लोकप्रतिनिधींची व सरकारची आदिवासींबद्दलची कणव ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात’ या वाक्प्रचाराची वारंवार आठवण करून देणारीच का असावी?

LEAVE A REPLY

*