धरणगावात आज शेतकरी संघर्ष मोर्चा

0
धरणगाव  / ‘शेतकरी बांधवांनो…मागितल्या शिवाय मिळणार नाही, हे दळभ्रदी सरकार हालणार नाही’ अशी आक्रमक साद देत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी उद्या शनिवारी (दि.20) शेतकरी संघर्ष मोर्चाचे आयोजन केले आहे.
या मोर्चासाठी राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. मोर्चात हजारो शेतकरी सहभागी होतील असा दावा आयोजकांकडून केला जात आहे.
राज्यात शेतकरी त्रस्त आणि सत्ताधारी मस्त असे चित्र आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी आघाडीने आंदोलन केले मात्र, सरकार याबाबत गंभीर नाही.
कर्जमाफीसह कृषीपंपासाठी अखंडीत विजपुरवठा, शेतीमालाला हमीभाव, कापसाला सात हजाराचा भाव मिळावा, धरणगावच्या जलशुध्दीकरण केंद्राचे काम त्वरीत मार्गी लागावे आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा असल्याची माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आज दिली होती.

शेतकर्‍यांच्या सातबारा कोरा करण्याची राष्ट्रवादीची मागणी जुनीच आहे. शेतकर्‍यांना कर्जाची भिती नसती तर त्याने आत्महत्या केलीच नसती.

म्हणूनच कर्जमाफी हा एकच पर्याय असल्याचा दावा गुलाबराव देवकर यांनी केला आहे. वृध्द शेतकरी आणि भुमिहिन शेतमजूराला पेंन्शन लागू करावे, लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना दाखले उपविभागीय कार्यालयातूनच मिळावे, दोनगाव, कानळदा येथे गिरणेवरील दोन प्रस्तावित बंधार्‍यांचे काम त्वरीत सुरू करावे, अंजनी-गिरणेचे पाणी दोन्ही वराड, मुसळी, चिंचपूरा, एकलग्न आदी गावातील शेतकर्‍यांना मिळावे, अंजनी कालव्याचे काम त्वरीत पुर्ण करावे यांसह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा असल्याने संपूर्ण तालुक्यात या मोर्चा बाबत जनजागृती करण्यात आली आहे.

माजी मंत्री गुलाबराव देवकर हे या मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याने श्री.देवकरांच्या कमबॅक संदर्भातही तालुक्यात कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून यामुळेच मोर्चा कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

धरणगाव शहरातील श्री बालाजी मंदिरापासून सकाळी 10 वाजता शेतकरी संघर्ष मोर्चाला प्रारंभ होणार आहे. धरणी चौक, कोर्टबाजार, परिहार चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गावरून उड्डानपुलावरुन हा मोर्चा तहसिल कचेरीवर जाणार आहे.

 

LEAVE A REPLY

*