मद्यपींच्या हाणामारीत एकाचा संशयास्पद मृत्यू

0
जळगाव  / कट लागल्याच्या कारणावरुन दोन मद्यपी तरुणांनी एकाला गुरुवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास बेंडाळे चौकात मारहाण केली.
या मारहाणीतून त्या इसमाचा मृत्यू झाला असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील झुणका भाकर केंद्राजवळ 40 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला.
याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यामध्ये डॉ.दशरे यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पो.ना. धनराज निकुंभ व संजय दोरकर करीत आहेत.

मयताच्या अंगावर संशयास्पद जखमा
जिल्हा रुग्णालयासमोर मिळून आलेल्या मयताची ओळख पटली नाही. त्याची ओळख पटविण्यासाठी जिल्हापेठ पोलीस प्रयत्न केले. दरम्यान, त्याच्या कपाळाला, तोंडाला, छातीवर संशस्पाद जखमा आहेत. त्यामूळे त्या इसमाला कोणीतरी मारहाण केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत होता. त्यादृष्टीने पोलिस तपास करीत होते.

एमआयडीसी पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात
जिल्हा रुग्णालयासमोर मयत अवस्थेत आढळलेल्या इसमाला दोन जणांनी रात्री फायटरने मारल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी मनोज सुरवाडे व विजय शामराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तुकारामवाडीतील संदीप वाणी याला ताब्यात घेतले.

कट लागल्यावरुन केली मारहाण
संदीप वाणी व त्याचा एक मित्र भूषण माळी हे दोघे गुरुवारी रात्री तुकाराम वाडीतून रेल्वेस्टेशनकडे जात होते. या दरम्यान राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ त्यांच्यासोबत चाळीसगाव येथील नाना पाटील म्हणून एक जण बसला. सुसाट वेगाने मोटारसायकलने रेल्वे स्टेशनकडे जात असतांना बेंडाळे चौकात पायी येत असलेल्या एका 40 वर्षीय इसमाला वाणी याच्या दुचाकीचा कट लागला. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी रेल्वे स्टेशनवर जात असलेल्या नाना पाटील नामक तरुणाने तेथून काढता पाय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

फायटरने वार
माळी व वाणी या दोघांनी फायटर व लाकडी दांडक्याने त्या इसमास बेंडाळे स्टॉपजवळ असलेल्या धनराज कार डेकोरेटर यांच्या अर्धवट बांधकाम असलेल्या ओट्यावर मारहाण केली. हे घटनास्थळ ताब्यात घेतलेल्या संदीप वाणी या तरुणाने जिल्हापेठ पोलिसांना सांगितले. त्यानुसार सपोनि अजितसिंग देवरे सपोनि संदीप आराक यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी जवळच राहत असलेल्या अजय अंबादास खैरनार यांच्या पत्नीला रात्रीच्या घटनेबाबत विचारले असता त्यांना कोणताही आवाज आला नसल्याचे पोलिसांना सांगितले.

.. तर रात्रीच गुन्ह्याचा उलगडा !
चौकशीकामी ताब्यात घेतलेल्या तरुणाकडून मिळालेल्या माहितीनुसार ते दोघे असे तीन जण एका दुचाकीवर रेल्वेस्टेशनकडे गेले होते. यावेळी ट्रिपलशीट असल्याने वाहतुक पोलिसांनी त्यांना थांबविले असता, दोन जण पळून गेले. दुचाकीसोबत तरुणाला शहर पोलिसात कारवाईसाठी आणले. मात्र शहर पोलिसांनी तपास न करताच त्या तरुणाला रात्रीच सोडून दिले. जर पोलिसांनी त्या तरुणाची सखोल चौकशी केली असती तर या गुन्ह्याचा रात्रीच उलगडा झाला असता, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

*