मनपावर जप्तीची नामुष्की

0
जळगाव / मनपाच्या बांधकाम विभागातील मयत कर्मचारी निवृत्ती मोरे यांच्या पत्नीला उपदानाची रक्कम न दिल्याने महापालिकेच्या जंगम मालमत्ता जप्त करण्याची नामुष्की ओढवली होती.
परंतु आयुक्त जीवन सोनवणे यांनी दोन दिवसात उपदानाची रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे जप्तीची कारवाई टळली.
महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातीला कर्मचारी निवृत्ती बाबुराव मोरे यांचे चार वर्षापूर्वी निधन झाले. मनपा प्रशासनाने मयत कर्मचारी मोरे यांच्या पत्नीला उपदानाची 1 लाख 29 हजार 942 रुपये रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात होती.
यावर मोरे यांच्या पत्नी मुक्ताबाई यांनी कामगार न्यायालयात धाव घेवून मनपा विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

यावर न्यायालयाने मनपा प्रशासनाला उपदानाची 1 लाख 29 हजार 942 रुपयांची रक्कम व त्यावरील 3 मे 2013 पासून वसूल होईपर्यंत 10 टक्के व्याजासह रक्कम देण्याचे आदेश दिले होते.

मात्र मयत कर्मचार्‍यांच्या वारसदारास रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात होती.

दरम्यान, आज मंडळ अधिकारी मिलिंद बुवा, तलाठी फिरोज खान, ऍड. गजानन जाधव हे मनपाची मालमत्ता जप्तीच्या कारवाईसाठी आले होते. यावेळी आयुक्त जीवन सोनवणे यांनी उपायुक्त आल्यावर एक-दोन दिवसात रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे जप्तीची नामुष्की टळली.

LEAVE A REPLY

*