मराठीतील पहिल्या शिलालेखाची दुरावस्था

0
रायगड / अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील देशाचा प्राचीन ठेवा असलेला पहिल्या मराठी शिलालेखाची शासकीय उदासिनतेमुळे दुरावस्था झाली आहे.
हा शिलालेख संस्कृत, मराठी भाषेतील देवनागरी लिपीतील असून नऊ ओळींचा आहे. मात्र, काळाच्या ओघात लेखावरची अक्षरे पुसली गेल्याने आता ती पाहायला मिळत नाहीत.
योग्य वेळीच या शिलालेखाचे सरकारने जतन, संवर्धन केले नाही तर तो नष्ट होण्याची शक्यता आहे.
सोमेश्वर महादेव मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला हा शिलाहारकालीन शिलालेख पहायला मिळतो. हा शिलालेख शके 934, प्रधावी संवत्सर, अधिक मास (ज्येष्ठ), शुक्रवार, 16 मे इसवी सन 1012 चा आहे. 16 मे रोजी या शिलालेखाला 1005 वर्षे पूर्ण झाली.

या शिलालेखात राजा केसीदेवराय याचा प्रधान भइर्जू सेणुई याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली (मापे) धान्य दिल्याचा उल्लेख आहे.

सांस्कृतिक वारसा म्हणून अनेक अंगांनी आक्षीच्या शिलालेखाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

शके 1038 म्हणजे इसवी सन 1116 मधील श्रवणबेळगोळ येथील जैन दिगंबर पंथीय बाहुबलीफच्या पायथ्याशी असलेला शिलालेख मराठीतील पहिला म्हणून मानला जात होता.

परंतु शके 934 म्हणजेच इसवी सन 1012 मधील आक्षी येथील मराठीतील शिलालेख पहिला असल्याचे प्रसिद्ध संशोधक डॉ. शं.गो. तुळपुळे यांनी सप्रमाण सिद्ध केले.

पण, रायगड जिल्ह्यासाठी या अभिमानास्पद असलेल्या शिलालेखाच्या जतनासाठी जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने कोणताही पुढाकार घेतला नाही.

राज्याच्या या प्राचीन ठेव्याकडे असेच दुर्लक्ष झाले, तर तो नष्ट होण्याची शक्यता आहे. शिलालेखाचे जतन-संवर्धन व्हावे, पुरातत्व अभ्यासक, पर्यटक तसेच सर्वांनाच उपयुक्त ठरेल, असे त्याचे स्मारक उभारले जावे, अशी मागणी केली जात आहे.

प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचातर्फे शिलालेख जतनाबाबतचे निवेदन रायगड जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

प्रभारी जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाचे कार्याध्यक्ष उमाजी म. केळुसकर, प्रमुख कार्यवाह नागेश कुळकर्णी, सल्लागार उमेश तथा बाळू पवार, वामन पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*