भुसावळ औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई / भुसावळ येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे काम कालमर्यादेत पूर्ण होईल, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात ऊर्जा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव सुमित मल्लिक, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली येणार्‍या महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तिन्ही कंपन्यांमार्फत राबविण्यात येणार्‍या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि भविष्यातील नियोजनाचा यावेळी आढावा घेतला.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, भुसावळ थर्मल पॉवर प्रोजेक्टचे काम भेल (भारत हेवी इलेक्ट्रिकल) ही कंपनी करणार असून या कंपनीने कामाचा आराखडा तात्काळ तयार करावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना यावेळी दिल्या.

नागपूर येथे राबविण्यात येणार्‍या स्मार्ट ग—ीड प्रकल्पाबाबतही तपशीलवार आढावा सादर करण्याचे निर्देश दिले. महाऊर्जाच्या सहकार्याने महावितरणमार्फत सौर कृषीपंपाची योजना राबविण्यात येत आहे.

यासाठी राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यांनी तयार केलेल्या निविदेचा पूर्णपणे अभ्यास करावा. तसेच त्यानंतर दोन ते तीन जिल्ह्यांची मिळून एक क्लस्टर योजना तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
मुंबईत टाटा पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्यामार्फत विद्युत उपकेंद्रे तयार करण्यात येत आहेत. ही केंद्रे उभारण्यासाठी विकास नियमावलीमधील काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.

विकास नियमावलीनुसार विशेष प्रकारच्या उपकेंद्रासाठी परवानगी घ्यावी लागत असली तरी आता यामध्ये काही विशेष सूट देत नियमावली शिथील करण्यात आली आहे.

त्यामुळे उपकेंद्र उभारण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना, महानिर्मितीतर्फे पारेषण संलग्न प्रायोगिक तत्वावर कृषी फिडर सौर प्रकल्प, भुसावळ येथील थर्मल पॉवर प्रकल्प याबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

मुंबईसाठी ऊर्जा विभागामार्फत टाटा आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्यामार्फत उभारण्यात येणार्‍या वितरण उपकेंद्रांच्या उभारणीसाठी महापालिका आयुक्तांनी विकास नियंत्रण नियम शिथील केल्याचे सांगितले.

खारघर-विक्रोळी आणि तळेगाव-कळवा येथील मार्गावर येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी विभागाने पाठपुरावा करुन तसेच या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावा, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*