मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनाची लूट, 1 कोटींचा माल लंपास

0
पालघर / विरार पूर्वेकडील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशीद कोपर येथे एका ट्रेलरला लुटल्याची घटना घडली. चालकाला मारहाण करून चोरट्यांनी ट्रेलर लुटला.
ट्रेलरमधील सुमारे 26 टन 316 किलो कॉपर वायरचे 6 एमएमचे 10 रॉड चोरट्यांनी लंपास केले आहेत. बाजारात याची किंमत 1 कोटी 17 लाख 57 हजार 351 रुपये एवढी आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गोपाळ लोहार हे तळोजा येथील हिंदुस्थान कॉपर लिमिटेड कंपनीचा कॉपर वायरचा माल जयपूरला वाहून नेत होते.

रात्री अडीच वाजता त्यांची गाडी काशीदकोपर येथील नवीन पुला जवळ आली.

या दरम्यान अचानक एक सफेद रंगाची जीप आडवी आली आणि ट्रेलर अडवला.

या जीपमधून तीन व्यक्ती उतरल्या. या व्यक्तींनी ट्रेलरचा चालक गोपाळ लोहार याला खाली उतरवून मारहाण केली.

चोरट्यांनी त्यांच्याकडील असलेला लाव्हा कंपनीचा मोबाईल काढून घेतला. लोहारला मारहाण करून त्याचे डोळे बांधून त्याला अर्ध्या वाटेत सोडून दिले.

यानंतर चोरटे त्यांचा ट्रेलर घेवून फरार झाले. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी ट्रेलरवरील माल उतरवून दुसर्‍या गाडीत भरला आणि ते पसार झाले.

या घटनेनंतर नागरिक संताप व्यक्त करत असून महामार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.

रात्रीच्या वेळी वाहने अडवून लुटमार करणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लुटमारीच्या घटनेत आता पुन्हा वाढू लागल्या आहेत. विरार पोलीस फक्त रेतीच्या गाड्यांवर विशेष लक्ष देतात, असे नागरिक सांगत आहेत.

LEAVE A REPLY

*