मनपा कर्मचार्‍यांवर येणार गंडांतर ?

0
जळगाव  / तत्कालीन जळगाव नगरपालिकेत सन 1991-92 व 1997-98 मध्ये कर्मचारी भरती करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच काही कर्मचार्‍यांना उड्डाण पदोन्नत्या देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, ही नियुक्त व पदोन्नत्या देतांना कार्यपद्धतीचा अवलंब केला नसल्याचा ठपका ठेवून विशेष लेखा परिक्षण करण्याची मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार शासनाने भरती प्रक्रियेबाबत लेखा परिक्षण करण्यास मान्यता दिली असून लेखा परिक्षण पथकाची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांवर गंडांतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मनपा कर्मचारी भरती प्रक्रिया व उड्डाण पदोन्नत्या बेकायदेशीर झाल्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने विभागीय चौकशी देखील झाली.
तत्कालीन जळगाव नगरपालिकेने 1991-92 मध्ये वर्ग 3 व 4 च्या 243 मंजूर पदांपैकी 43 पदे भरण्यात आली. त्यानंतर दोन-तीन दिवसातच कर्मचार्‍यांना उड्डाण पदोन्नती दिली. तसेच 1997-98 मध्ये 1 हजार 59 पदे मंजूर झाली होती.
त्यापैकी 523 सफाई कामगारांची पदे व्यपगत झालेली आहेत. तसेच वर्ग 4 ची 536 पदे एकाच दिवशी दि.13 मे 1997 रोजी भरण्यात आलेली आहे.
वर्ग 3 च्या 273 पदांपैकी 182 पदांवर विहीत कार्यपद्धतीचा अवलंब न करता पात्र कर्मचार्‍यांना डावलून काही कर्मचार्‍यांना पदोन्नत्या व उड्डाण पदोन्नत्या देण्यात आल्या.
91 पदे कुठलीही जाहिरात न करता भरण्यात आलेली असल्याचे विभागीय चौकशीच्या अहवालात नमूद आहे. विभागीय चौकशीचा अहवाल दि.18 फेब्रुवारी 2016 रोजी समितीने तत्कालीन आयुक्तांकडे सादर केला.
या अहवालानुसार तत्कालीन आयुक्तांनी शासनाकडे लेखापरिक्षण करण्याची मागणी केली. त्यानुसार शासनाने लेखापरिक्षण करण्यास मान्यता दिली आहे.

लेखा परिक्षणासाठी पथक नियुक्त
महानगरपालिकेतील कर्मचारी भरती आणि उड्डाण पदोन्नत्याबाबत लेखा परिक्षण करण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विशेष लेखापरिक्षणासाठी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करुन द्यावी, असे आदेश शासनाने महानगरपालिकेला दिले आहे.

कर्मचार्‍यांवर येणार गंडांतर
सन 1991-92 व 1997-98 मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत तसेच पदोन्नत्यांमध्ये विविध कार्यपद्धतीचा अवलंब केला गेला नसल्याचा ठपका विभागीय चौकशीच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे विशेष लेखापरिक्षण अहवाल झाल्यानंतर अनेक कर्मचार्‍यांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रियेतील काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्ती वेतनावरही टाच येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY

*