तांबापुरात हाणामारीमुळे तणाव

0
जळगाव  / तांबापुरामध्ये क्षुल्लक कारणावरुन हाणामारी झाली. यात तीन जखमी झाले. ही घटना रात्री 10.15 वाजेच्या सुमारास घडली.
मोठा जमाव एकत्रीत आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. दंगा नियंत्रण पथकासह एमआयडीसी पोलीस घटनास्थळी बंदोबस्ताकामी तैनात होते.
याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, तांबापुरातील मच्छीबाजारामध्ये राहत असलेले मकसुद सलीम खाटीक ह्यांच्या घरासमोर त्यांची बकरी उभी होती.
दरम्यान गवळीवाड्यातील योगेश हटकर हे दुचाकीवरुन जात होते. त्यांच्या दुचाकीचा बकरीला कट लागला. यावेळी मकसुदचे आई रईसाबी सलिम खाटीक यांनी हटकरला जाब विचारला.
त्यावरुन दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. या वादातुन मकसुद व योगेश यांच्यात हाणामारी झाली. भांडण सोडण्यासाठी आई रईसाबी, वहिणी शबाना, वडील रईस आल्याने त्यांनाही योगेश यांनी मारहाण केली.
यानंतर खाटीक कुटूंबिय एमआयडीसी पोलीसांत तक्रार देण्यासाठी गेले. याचा राग आल्याने योगेश याने त्याच्या काही मित्रांसोबत खाटीक कुटूंबियांच्या घरावर हल्ला चढविला.

लाठी काठ्यांनी मारहाण केल्याने यात तीन जण जखमी झाले. जखमीमध्ये रईसाबी,सलिम,शबाना रहिम खाटीक यांचा समावेश असून त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयात परिसरातील नागरीकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

मच्छीबाजारात दंगा नियंत्रण पथक
आव्हाणे येथील दंगलीच्या पार्श्वभुमीवर तांबापुरात वादातुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, यासाठी दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले.

तसेच डीवायएसपी सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक सुनिल कुर्‍हाळे यांच्यासह एमआयडी व जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

रात्री उशिरापर्यंत परिसरात तणावपूर्ण शांतता होती.

LEAVE A REPLY

*