7 हजार शिक्षकांची बेकायदा भरती !

0
 मुंबई / राज्यातील शासकीय व खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकभरतीला पूर्णपणे बंदी असताना, शिक्षण अधिकार्‍यांच्याच संगनमताने तब्बल 7 हजार 228 शिक्षकांच्या बेकायदा नेमणुका करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
हा प्रकार कुंपणच शेत खात असल्यासारखा आहे. विशेष म्हणजे याबाबत शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

विशेष म्हणजे बेकायदा शिक्षकांच्या वेतनावर 97 कोटी रुपयांचा खर्च होत असल्यामुळे आधीच निधीची वानवा असलेल्या शिक्षणावर या नियमबाह्य खर्चाचा बोजा पडणार आहे.

या प्रकरणात राज्यभरातील 62 शिक्षण अधिकार्‍यांना नोटिसा बजावल्या असल्या, तरी अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, अशी माहिती मिळाली आहे.

या बेकायदा शिक्षकभरतीची गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण विभागात, शिक्षक संघटना व शिक्षकांच्या नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍या उमेदवारांमध्ये चर्चा सुरू आहे.

बेकायदा शिक्षकांची भरती करून गरीब, गुणवत्ताधारक व प्रामाणिक पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याच्या तीव— प्रतिक्रियाही आता व्यक्त होऊ लागल्या आहेत.

राज्य सरकारने 2011 मध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये अचानकपणे पटपडताळणी केली. त्यात 20 लाख 70 हजार 520 विद्यार्थी बोगस असल्याचे आढळून आल्याने सरकार हादरून गेले.

त्यानंतर शासनाने बोगस विद्यार्थी दाखवून वेतन व वेतनेतर अनुदान लाटणार्‍या शिक्षण संस्था व शिक्षकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला.

पटपडताळणीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची अनुपस्थिती असलेल्या शाळा बंद करणे व त्यातील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना अतिरिक्त ठरवून त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात आणि 50 टक्क्यांपर्यंत अनुपस्थित विद्यार्थी असलेल्या शाळांमधील अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांना अन्य शाळांमध्ये सामावून घेणे असे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

त्याला अनुसरून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे अन्य शाळांमध्ये शंभर टक्के समायोजन झाल्यशिवाय खासगी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती करू नये, असा 2 मे 2012 रोजी तत्कालीन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी आदेश काढला.

विविध शाळांमधील बेकायदा शिक्षकांच्या नेमणुका रद्द केल्या का, त्यांच्याकडून वेतन वसूल केले का, याबाबतही शिक्षण विभागाकडून अद्याप काही स्पष्टीकरण दिले गेले नाही.

LEAVE A REPLY

*