आरोग्य यंत्रणा बळकट नाही !

0

जळगाव / औषधी तयार करण्यात जगात देशाचा चौदावा क्रमांक आहे. देशभरातून तब्बल 80 हजार कोटी रुपयाची औषध निर्यात केली जाते. मात्र असे असतांनाही आरोग्य यंत्रणा बळकट नाही, अशी खंत केमिस्ट असोसिएशनचे राज्याध्यक्ष आ.जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

दै.देशदूतच्या मुख्य कार्यालयाला आ.जगन्नाथ शिंदे, केमिस्ट असो.चे जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते देशदूत परिवाराशी त्यांनी दिलखुलास संवाद साधला.

प्रारंभी दै.देशदूतचे संपादक हेमंत अलोने, व्यवस्थापक मनिष पात्रीकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी केमिस्ट असो.चे पदाधिकारी शामकांत वाणी, इरफान सालार उपस्थित होते.

आ.जगन्नाथ शिंदे संवाद साधतांना पुढे म्हणाले की, औषधांच्या किंमतीवर आतापर्यंत सरकार नियंत्रण ठेवत होते. परंतु 2013 मध्ये मार्केट बेस्ड पॉलिसी आली. जगात औषधी तयार करण्यात देशाचा चौदावा क्रमांक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

4 हजार औषधींना पेटंट
देशभरात 20 हजार औषध कंपन्या आहेत. यातील 4 हजार औषधींना पेटंट आहेत. मिळालेल्या पेटंटला 20 वर्षापर्यंत मोनोपॉली मिळत असलीतरी एका औषधीच्या संशोधनासाठी 10 वर्ष लागत असल्याचे आ.शिंदे यांनी सांगितले.

जेनेरिकमुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता
जेनेरिक औषधांमुळे भविष्यात दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. चांगल्या दर्जेदार कंपन्यांची औषध मिळायला पाहिजे. औषध अन् उपचाराविना जवळपास सहा ते आठ टक्के मृत्यू होत असल्याचे आ.शिंदे यांनी सांगितले. शासनाने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य सुविधा पुरवून आरोग्य यंत्रणा बळकट करायला पाहिजे. अशी अपेक्षा देखील आ.शिंदे यांनी व्यक्त केली.

ऑनलाईनमुळे ग्रामीण भागात अनेक अडचणी
औषध विक्रेत्यांनी पोर्टलवर ऑनलाईन औषधी अपलोड करुन विक्री करावी, असा घाट घातला जात आहे. मात्र ग्रामीण भागांमध्ये विज उपलब्ध होत नाही. इंटरनेटची सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतील. ऑनलाईन औषध विक्रीमुळे गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असेही आ.शिंदे यांनी सांगितले. त्यामुळेच ऑनलाईन औषध विक्रीला विरोध असल्याचे आ.शिंदे यांनी स्पष्ट केले.

आरोग्य यंत्रणेत देश 125 व्या क्रमांकावर
आरोग्य यंत्रणेच्या अनुषंगाने जगात भारत देश 125 व्या स्थानावर आहे. त्यामुळे देशात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना करायला हवी, अशी अपेक्षा देखील आ.जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*