कर्नाटकच्या जय महाराष्ट्र बंदीविरोधात नितेश राणेही आक्रमक

0
मुंबई / कर्नाटकच्या जय महाराष्ट्र बंदीविरोधात आमदार नितेश राणे यांची स्वाभिमान संघटनाही आक्रमक झाली आहे. मुंबईतील कर्नाटक संघ आणि कोल्हापुरातील कर्नाटकच्या बसेसवर जय महाराष्ट्र लिहून प्रत्युत्तर दिले.
सीमा भागात जय महाराष्ट्र बोलण्यावर बंदी घालणार्‍या कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांच्याविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कानडी फतव्याला जशास तसे उत्तर दिले.

मुंबईतील माटुंगा परिसरात असलेल्या कर्नाटक संघच्या कार्यालयासमोर स्वाभिमान संघटनेने निदर्शने करुन कर्नाटक संघाच्या फलकावर आणि कोल्हापुरात कर्नाटक परिवहनच्या बसेसवर जय महाराष्ट्र लिहून प्रत्युत्तर दिले.

कर्नाटक सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांना आणि त्या भागातून निवडून येणार्‍या लोकप्रतिनिधींना जबरदस्तीने कर्नाटक राज्यात डांबण्यासाठी नवा कायदा करण्याच्या तयारीत आहे.

यानुसार बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांना तसेच त्या भागातून निवडून येणार्‍या लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र बोलण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

सीमाभागातील मराठी लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट घोषणा दिली तर त्यांचे लोकप्रतिनिधींचे पद रद्द करण्यात येणार आहे. या महाराष्ट्रद्वेषी फतव्यामुळे सीमा भागात तसेच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

LEAVE A REPLY

*