जळगावात बंद घराला आग

0

जळगाव / जळगावातील भरवस्तीत असलेल्या जयकिसनवाडीत बंद घराला भिषण आग लागली. आगीत दोन मजली लाकडी कौलारु घर जळुन खाक झाले.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागासह नागरीकांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र घरात ऑईलचे बॅरल असल्याने आगीचे लोट आकाशी भिडत होते. घरात ऑईलसह वाहनांमध्ये वापरणारे वॉटर कुलंट असल्याने धुराचे लोटही परिसरात पसरत होते.

यामुळे प्रचंड पळापळ होवुन खळबळ उडाली होती. ही घटना दुपारी 2.05 वाजता घडली. दरम्यान, आग लावल्याची तक्रार शहर पोलीसांत देण्यात आली आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील जयकिसनवाडीतील शांती निवास या जुनी लाकडी वाडा आहे. या वाड्यात विनायकराव दिक्षीत, यशवंत वामन चौधरी, बंसीलाल रसवंतीचे आनंद राणा यांचे लागुन घरे आहेत.

यातील विनायकराव दिक्षीत यांच्या वरच्यावर मजल्यावर असलेल्या मालकी हक्कावरुन न्यायालयात दावा प्रलंबित आहे. दरम्यान आज दुपारी 2.05 वाजेच्या सुमारास अचानक दिक्षीत यांच्या घराकडून आग लागली.

प्रचंड पळापळ
आगेची माहिती कळताच परीसरातील नागरीकांनी भर उन्हात आग विझविण्यासाठी खटाटोप केला़ तसेच काहींनी अग्निशमन तसेच पोलिसांना आगीबाबत कळविले. दोन मजली कौलारु इमारतीत आग विझवण्यासाठी अनेकांनी शेजारील बिल्डींगच्या गच्चीवर जावून पाणी टाकत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

इमारतीचा कोळसा
जयकिसनवाडीतील शांती निवास या वाड्याला लागलेल्या आगीत दोन मजली लाकडी इमारतीचा जळून अक्षरशः कोळसा झाला. कौलारु व लाकडी छत ही जळून खाक झाले.

12 बंबांनी विझवली आग
घराला आग लागल्याचे कळताच मनपाच्या महाबळ, गोलाणी, एमआयडीसी व जैन येथील अग्निशमन विभागाचे तब्बल 12 बंब घटनास्थळी दाखल झाले. दुपारी 2 ते सायं. 7 वाजेपर्यंत आग विझवण्याचे मदतकार्य सुरु होते. रात्री उशीरापर्यंत आग धुमसतच होती.

न्यायालयात प्रकरण प्रलंबित
विनायकराव दीक्षित यांनी मालकी हक्काबाबत न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे. हा दावा न्यायालयात प्रलंबित असून यातूनच आग लावण्यात आली असावी, असा कयास देखील लावण्यात येत होता. तर दुसरीकडून दोन भाडेकरु सोडले तर कुणीही मालक वास्तव्यास राहत नसल्याने आगीच्या कारणाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती.
ज्वलंशील पदार्थ घरामध्ये
ज्या घरात आग लागली त्या घरात कुणीही वास्तव्यास नव्हते़ मात्र तळमजल्यामध्ये अरुण कस्तुरे यांचे ऑईलचे बॅरल व वाहनांमध्ये वापरण्यात येणारे वॉटर कुलंट ठेवलेले होते. तसेच काही ऑईलच्या जुन्या कॅन ठेवलेल्या होत्या. त्यामुळे अग्निशमन विभागाला आग विझवण्यास अडथळा निर्माण होत होता. ज्वलंशील पदार्थ ठेवल्यामुळे नागरीकांमध्ये देखील नाराजी व्यक्त केली जात होती.

रसवंतीची मशिनरी जळून खाक
शांती निवास हे बन्सीलाल रसवंती यांचे असून त्यामध्ये देवतांच्या मूर्त्या तसेच रसवंतीसाठी लागणार्‍या मशिनरी ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय फ्रिज व अन्य साहित्यही होते. सुमारे 2 ते अडीच लाखाचे साहित्य जळून खाक झाल्याचा अंदाज अमित राणा यांनी वर्तवला आहे.
इमारत पाडण्याचा दिला होता प्रस्ताव
ही इमारत धोकेदायक असल्याने ती पाडण्यासाठी महापालिकेकडे तीन वर्षापुर्वी परवानगी मागितली होती. तशी परवानगी मनपाने दिली होती. मात्र आपापसातील वादामुळे अडीच वर्षापासून इमारत पाडता आली नसल्याची खंत आनंद राणा यांनी व्यक्त केली.

अरुण कस्तुरेंनी लावली आग
विनायक दीक्षित यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रारअर्ज देत फर्निचर, लाकडी कपाट यासह सुमारे 25 लाखाचे नुकसान झाल्याचे सांगितले. तक्रार अर्जामध्ये अरुण प्रल्हाद कस्तुरे यांनी बेकायदा घरावर ताबा घेत त्यामध्ये ज्वलंनशील असलेले ऑईल ठेवले. त्यामुळेच आग वाढल्याचे नमूद करत मालमत्ता हडप करण्यासाठी ही आग पुर्वनियोजीत लावण्यात आल्याची तक्रार शहर पोलिसांना दिली आहे.

एका महिलेची तारांबळ
शेजारी आगीत घराचा कोळसा होत असतांना रोहिणी चौधरी या घरातून एकएक वस्तु बाहेर काढत होत्या. तसेच मुंबई येथील आपल्या मुलाला फोन करत होत्या. मात्र त्यांच्या मदतीला आग बघणार्‍यांच्या गर्दीतून कोणीही येत नव्हते. रडत असलेल्य महिलेला धीर देणेही या गर्दीला सूचले नाही. शेवटी स्वतः महिलेने खंबीर होवून शर्थीचे प्रयत्न केले.

चौकशी करणार – डीवायएसपी
आगीची सुरुवातीला अकस्मात नोंद करण्यात येईल. मात्र ज्वलंशील पदार्थ रहिवास असलेल्या परिसरात कसे आले? तसेच आगीबाबत काही संशयास्पद चर्चा कानी येत असून संपूर्ण चौकशी करण्यात येईल व दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे डीवायएसपी सचिन सांगळे यांनी सांगितले.

मोटारसायकल अग्नीशमन बंबाच्या खाली
आग विझवत असतांना दीक्षितवाडीतील दोघे रस्ते पोलिसांनी बंद केले होते. मात्र एका दुचाकीस्वाराने (क्र.एम.एच. 19 एसी 5606) मध्ये दुचाकी घातली.त्याला एकाने हटकवले असता त्याच्याशी त्याने वाद घातला. याचवेळी रिव्हर्स घेत असलेल्या अग्निशमन बंब दुचाकीला धडकला. त्यामुळे दुचाकीचे नुकसान झाले.

लग्नसोहळ्यावर आगीचे विघ्न
नवजीवन मंगल कार्यालयात शिरपूर येथील गोसावी व जळगाव तालुक्यातील नांदगाव येथील गिरी परिवार यांचा विवाह सोहळा होता. वधु व वराने माळ टाकताच आगीची माहिती कळाली. आग लागलेल्या घरासमोर वधु पित्याचे चारचाकी वाहन (क्र.एम.एच. 18 एजी 932) लागलेले होते. या वाहनाचे काच तोडून वर्‍हाडींनी कारला सुरक्षित ठिकाणी हलविले. तसेच एमएच 15 डीसी 8948 ही कारही आगीमुळे पेटेल तोच वर्‍हाडींनी तिलाही लोटत सुरक्षित ठिकाणी हलविली. मात्र लग्नसोहळ्यात आगीमुळे घबराहट निर्माण झाली होती.

साप्ताहीक सुटीवर गेलेले कर्मचारीही घटनास्थळी
अग्निशमन विभागाचे अधिकारी वसंत कोळी, मुख्य फायरमन शसीकांत बारी, फायरमन अश्विजीत घरडे, चालक देविदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण यांच्यासह 25 ते 30 कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यापैकी 7 ते 8 कर्मचार्‍यांच्या साप्ताहीक सुटी असूनही ते मदतकार्यासाठी धावून आले. दरम्यान मिनी फोम टेंडरमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तसेच त्यांनी आग धुमसत असतांनाच मोठ्या हिंमतीने वॉटर कुलींगसह ऑईलचे डबे बाहेर काढले त्यामुळे काहीअंशी आग आटोक्यात आली.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
आगी लागलेल्या ठिकाणी नागरीकांच्या मोठ्या प्रमाणात पळापळ झाली. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणून डीवायएसपी सचिन सांगळे, शहर पोलिस ठाण्याचे सपोनि दीपक गंधाले यांच्यासह इआरटी पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*