शिवसेनेची बँक शाखांवर धडक

0
धरणगाव  / शहरातील सर्वच एटीएम मशिन बंद असून ते सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी आज आक्रमक भुमिका घेतली.
शेतकर्‍यांना पिक कर्जाचे पैसे काढण्यासाठीही अडचण येत असल्याने शिवसेनेने आज बँकावर धडक दिली. शेतकर्‍यांच्या पिक कर्जाची रक्कम एटीएम मधूनच मिळत आहे.
मात्र, शहरातील एटीएम बंद असल्याने शेतकर्‍यांची कुचंबणा होत असल्याने एटीएम सेवा सुरळीत करण्यासाठी बँकांना 48 तासांचा अल्टीमेटम देण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी ‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.

शहर शिवसेना, युवासेना व विद्यार्थी सेनेतर्फे आज शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय स्टेट बँक, युनियन बँक, जेडीसीसी बँक, महाराष्ट्र बँकेच्या शाखा कार्यालयात धडक दिली. याप्रसंगी संबंधीत शाखा व्यवस्थापकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

धरणगाव शहरातील सर्व एटीएम मशीन बंद आहेत. त्यात पैसे नाहीत तरी लवकरात लवकर सर्व एटीएम मशिन सुरू करावेत.

बँकांच्या उदासिनतेमुळे नागरिकांसह शेतकर्‍यांना प्रचंड अडचणी येत आहेत. त्या अडचणी लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

बँकांनी त्वरीत एटीएम सेवा सुरळीत करावी ही शिवसेनेची माफक अपेक्षा आहे. आम्ही बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना अतिशय विनम्रपणे याबाबत कल्पना दिली आहे.

त्यांनी दोन दिवसात एटीएम सेवा सुरळीत होईल असा शब्द दिला आहे. आम्ही दोन दिवस वाट पाहू परिस्थिती सुधारली नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा गुलाबराव वाघ यांनी ‘देशदूत’शी बोलतांना दिला.

धरणगावात बँक शाखा कार्यालयांची परिस्थिती अतिशय केविलवाणी आहे. राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेच्या एकाही शाखेत कर्मचार्‍यांची संख्या पुरेशी नाही. परिणामी आहेत त्या कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून यामुळे त्यांची चिडचिड वाढत आहे. परिणामी ग्राहकांना बँकांमध्ये अतिशय अपमानजनक वागणूक मिळत आहे.

याच परिस्थितीत आता एटीएमकडेही दुर्लेक्ष झाल्याने परिस्थिती गंभीर बनली असल्याचा आरोप गुलाबराव वाघ यांनी केला आहे. एटीएम म्हणजे ‘ ऐनी टाईम मनी’ धरणगावात मात्र, एटीएमचे एटीनोएम म्हणजेच ‘ऐन टाईम नथींग मनी’ असेच नामकरण करण्यात आल्याचा उपरोधीक टोलाही गुलाबरावा वाघ यांनी लगावला.

बँकेच्या अधिकार्‍यांनी आमच्या संयमाचा अंत पाहू नये. शेतकर्‍यांची कुचंबणा थांबली नाही तर होणार्‍या गंभीरपणाला बँक व्यवस्थापनच जबाबदार राहिल असा इशारा गुलाबराव वाघ यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*