विवाहितेला जीवंत जाळले; पतीसह चौघां विरुध्द खूनाचा गुन्हा

0

धुळे / माहेरुन दोन लाख रुपये शेती व्यवसायासाठी आणले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ करुन तिला रॉकेल टाकून जीवंत जाळून टाकल्याची घटना खर्दे, ता.शिरपूर येथे घडली. या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, खर्दे, ता.शिरपूर येथे राहणारी अर्चना सुरेश कोळी (वय 35) या विवाहितेने माहेरुन दोन लाख रुपये शेती व्यवसायासाठी आणले नाहीत म्हणून तिचा दि.5 ते 7 ऑक्टोबर 2016 दरम्यान छळ करण्यात आला. यातूनच अर्चनाच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जीवंत जाळले.

याबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, परंतु मयताचे वडील देविदास उत्तम कोळी यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात दि.21 मे रोजी लेखी तक्रार दिली.

त्यात त्यांनी अर्चनाच्या सासरकडील मंडळींनी छळ करुन तिला जीवंत जाळल्याचे तक्रारीत म्हटले. त्यावरुन भादंवि 302, 498 (अ), 34 प्रमाणे सुरेश भाईदास बागूल, भाईदास कृष्णा बागूल, सुमन भाईदास बागूल आणि मनोज भाईदास बागूल यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

दुकान फोडले – लामकानी, ता.धुळे येथील होळी चौकात संदीप पुंडलीक बाविस्कर यांच्या मालकीचे किराणा दुकान आहे. या दुकानातून अज्ञात चोरट्याने दि.20 मेच्या रात्री नऊ ते 21 मेच्या सकाळी सात वाजेदरम्यान पाच सोयाबीन तेलाच्या लोखंडी टाक्या 63 हजार 700 रुपये किंमतीच्या चोरुन नेल्या. याबाबत सोनगीर पोलिस ठाण्यात संदीप पुंडलीक बाविस्कर यांनी फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ बांगर हे करीत आहेत.

अपघातात ठार – मुंबई-आग्रा महामार्ग क्र.3 वरील हॉटेल शिवसाई जवळ सोनगीर शिवारात युवराज डोंगर भिल हा एमएच 18 एन 2594 क्रमांकाचे ट्रॅक्टर रस्त्याच्या विरुध्द बाजूला चालवित असताना समोरुन येणार्‍या एमएच 18 एटी 0823 क्रमांकाच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात हरेश्वर गुलाब देवरे (वय 28), रा.पिंपरखेडा, ता.शिंदखेडा हा मयत झाला. तसेच मोटारसायकलचे नुकसहान झाले. याबाबत नरेंद्र घनश्याम देवरे यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 304 (अ), 279, 337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 134, 177, 184 प्रमाणे युवराज डोंगर भिलविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ बांगर हे करीत आहेत.

मोटारसायकल चोरी – शहरातील भुजल कॉलनी, प्लॉट नं.81 मध्ये राहणारे गौतम चंद्रकांत पाटोळे यांनी त्यांच्या मालकीची 20 हजार रुपये किंमतीची एमएच 18 एएस 8895 क्रमांकाची मोटारसायकल घराच्या वॉलकंपाऊंडमध्ये लावलेली होती. अज्ञात चोरट्याने दि.20 मेच्या रात्री दहा ते 21 मेच्या सकाळी सात वाजेदरम्यान चोरुन नेली. याबाबत देवपूर पोलिस ठाण्यात गौतम चंद्रकांत पाटोळे यांनी फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ के.एम.पाटील हे करीत आहेत.

चाकूने हल्ला – शहरातील वरखेडी रोडवरील गायकवाड चौकात राहणारी सौ.सोनाली प्रकाश अहिरे (वय 25) यांच्या घरासमोर माया योगेश अहिरे यांनी घाणपाणी टाकले याबाबत विचारल्याचा राग येवून मायाने सोनालीला शिवीगाळ केली तर आरतीने हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तर योगेश याने चाकूने भोसकून जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत सौ.सोनाली प्रकाश अहिरे यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 326, 323, 504, 506, 34 प्रमाणे माया योगेश अहिरे, आरती पांडुरंग अहिरे, योगेश पांडुरंग अहिरे, दिनेश पांडुरंग अहिरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई गवई हे करीत आहेत.

चौगाव येथे हाणामारी – चौगाव, ता.शिंदखेडा येथे हाळवर पाणी भरण्याच्या वादातून हाणामारी झाली. यात लोखंडी सळई, कुर्‍हाड, काठ्या यांचा सर्रास वापर करण्यात आला. मारहाणीत सहा जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी 18 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, चौगाव येथे राहणारे योगेश भटू पाटील व पंकज भटू पाटील हे दोघे भाऊ दि.20 मे रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गावातील हाळवर गुरांना पाणी पाजत असताना त्या ठिकाणी शेवंताबाई बापू भिल या पाणी भरण्यासाठी आल्या. त्यांना हाळमध्ये पाणी कमी असल्याने नंतर पाणी भरा, असे सांगितले. त्याचा राग शेवंताबाई यांना आला. यातून योगेश व शेवंताबाई यांच्यात वाद झाला. या वादानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राहूल बापू अहिरे याने गैरकायदेशीर मंडळी जमवून हातात कुर्‍हाड, लोखंडी सळई आणि काठ्या घेवून पंकज पाटील यांच्या घरात प्रवेश केला. राहूल याने कुर्‍हाडीने पंकजचे डोके फोडले तर इतरांनी लोखंडी सळई, काठ्या व हाताबुक्यांनी पंकजसह त्यांचा भाऊ योगेश आणि त्यांची आई मंगलाबाई यांना मारहाण करुन शिवीगाळ केली. या मारहाणीत तिघे जण जखमी झाले. या प्रकरणी पंकज पाटील यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 326, 452, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 सह मुंबई पोलिस अधिनियम 36 चे उल्लंघन, 134 तसेच 37 (1) (3) चे उल्लंघन, 135 प्रमाणे राहूल अहिरे, गणेश बापू अहिरे, पावबा भास्कर भिल, भास्कर फुलसिंग अहिरे, विजू भास्कर भिल, बापू फुलसिंग भिल, रतन दगा भिल, मंगलसिंग भास्कर भिल, दिनेश बापू भिल, शेवंताबाई भिल, अरुणाबाई भास्कर भिल, बापू फुलसिंग याची सासू व सासरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
शेवंताबाई बापू अहिरे यांनी परस्पर तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, गावातील हाळवर पाणी भरण्यासाठी गेली असता योगेश भटू पाटील याने गुरांना पाणी पाजल्यानंतर पाणी भरा, असे सांगितले. यातून वाद झाला. योगेश पाटील याने शेवंताबाई यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. याबाबत शेवंताबाई भिल, त्यांचे पती बापू, दिनेश व गणेश हे गेल्याचा राग येवून योगेश पाटील यांनी जातीवाचक शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यात तीन जण जखमी झाले. त्यांच्या तक्रारीवरुन अनुसूचित जाती, जमाती सुधारीत कायदा 2015 चे कलम 3, (1) (आर) (एस) सह भादंवि 323, 504, 506, 143, 147, 149 तसेच मुंबई पोलिस अधिनियम 36 चे उल्लंघन 134, 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे योगेश पाटील, पंकज भटू पाटील, नथा हिंमत पाटील, भटू हिंमत पाटील, समाधान नथा पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

दारु पकडली – शहरातील देवपूर परिसरातील दत्तमंदिर चौक, स्वामीनारायण रोडजवळ डीवायएसपी यांच्या विशेष पथकाने 33 हजार 648 रुपये किंमतीचा दारुचा साठा जप्त केला. या प्रकरणी भटू शालिग्राम काळे, रा.जुनेधुळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलिस निरीक्षक किशोर शिरसाठ, विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षक राम सोनवणे, जमादार घनश्याम मोरे, पोकाँ पंकज चव्हाण, दिनेश परदेशी, सुनील पाथरवट, कबीर शेखर, किरण सावळे, नीलेश महाजन यांच्या पथकाने केली.
तरुणीवर बलात्कार – शिंदखेडा तालुक्यातील तरुणीचे शहरातील देवपूर बसस्थानकातून अपहरण करुन दिघावे, ता.साक्री व नाशिक येथे 45 वर्षीय व्यक्तीने तिच्याशी लग्न केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत दोंडाईचा पोलिस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत झिरवे, ता.शिंदखेडा येथील 22 वर्षीय तरुणीने दोंडाईचा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दि.7 मे रोजी सकाळी 9.35 ते 19 मे दरम्यान विवाहास सक्ती करण्यासाठी आप्पासाहेब नथ्थू दहिते याच्यासह सहा जणांनी देवपूर बसस्थानकातून अपहरण केले. त्यानंतर सदर तरुणीला दिघावे, ता.साक्री व नाशिक येथे नेवून तिच्याशी आप्पासाहेब दहिते याने बळजबरीने लग्न केले. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत त्या तरुणीच्या फिर्यादीवरुन भादंवि 376 (1), 366, 506, 4 प्रमाणे आप्पासाहेब दहिते, बायजाबाई पाहुणा, त्याचे दोन भाचे, भाची यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात बालक ठार – गरताड येथे राहणारे सुरेश सोनवणे यांचा सहा वर्षाचा मुलगा कृष्णा याला धुळे-चाळीसगाव रोडवर गरताड गावाच्या दरवाजाजवळ भरधाव वेगाने येणार्‍या एके 56/1956 क्रमांकाच्या ट्रकने धडक दिल्याने त्यात कृष्णा हा जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरेश सोनवणे यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 279, 337, 338, मोटार वाहन कायद्याप्रमाणे ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*