रंग मैत्रीचे, आयुष्याच्या सोबतीचे….

0
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. जन्मापासून तर अंतिम यात्रेपर्यंत मित्रांची साथ मिळत असते. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत कितीतरी मित्र मैत्रिणी आयुष्यात येत असतात. त्यातील फार थोडेच अंतिम यात्रेपर्यंत साथ देत असतात. आजच्या या स्पर्धात्मक आणि स्वार्थी जगात खरे मित्र कोण आणि खोटे मित्र कोण हे ओळखणे जरा कठिणच. हजारो मित्रांपैकी बोटावर मोजता येतील एवढेच मित्र निस्वार्थपणे आणि आपल्या आनंदासाठी झटत असतात.

आपल्याला जन्म देणारी माता ही आपली पहिली नी अंतापर्यंत निस्वार्थपणे साथ देणारी पहिली मैत्रिण असते. तर वडिल हे पहिले मित्र असतात. त्यानंतर भाऊ बहिण हे दुसरे मित्र असतात. यांच्यासोबतच वयाची तीन वर्ष कशी जातात ते कळत नाही. नंतर मैत्री होते ती गल्लीतील समवयस्क बालकांशी. ही मैत्री खेळण्याचे सोबती म्हणून होत असते. नंतर मैत्री होते ती प्ले सेंटरमधील मुलामुलींशी.

बाह्य मैत्रीचा खरा अर्थ कळतो तो पहिली दुसरीत. पहिली दुसरीतील मैत्री पुढे चौथीपर्यंत टिकते. पाचवीपासून काही जण दुसर्‍या शाळेत किंवा वडिलांची बदली झाल्याने दुसर्‍या गावाला निघून जातात. यातुन जो मित्र किंवा मैत्रिण पुढे दहावीपर्यंत सोबत आलेत त्यांच्यात मैत्रीचे खरे बंध बांधले जातात. पण यातही एक गोम अशी आहे की बहुतांशी मैत्री ही त्या त्या आर्थिक स्तरानुसार होत असते. दहावीच्या परिक्षेनंतर करीअरसाठी जो तो वेगवेगळ्या वाटांनी निघुन जातो. आणि दहावीपर्यंतच्या मैत्रीला येथेच अल्पविराम मिळतो.

करीअरसाठी कोणी आपल्याच मुळ गावात राहातो तर कोणी दुसर्‍या गावी निघून जातो. त्यामुळे पुढील शिक्षण जेथे घेतले जाते त्या शिक्षण संस्थेतील त्या वर्गातील नव्या मित्र मैत्रिणींशी ओळख होते. येथे बर्‍यापैकी समज आलेली असली तरी भावनिकतेच्या बळावर मैत्री कधी कधी दृढ होते तर कधी तुटत असते. याच वयात किशोरावस्था संपून तारूण्यावस्था सुरू होत असल्याने आकर्षणातून मैत्रीस सुरवात होत असते. तर कधी मतांशी सहमत होण्याने, तर कधी वैचारीक व बुध्दीमत्ता, प्रगल्भतेशी मिळतेजुळते असल्याने मैत्रीचे नवे बंध जुळत असतात.

कधीकधी ‘माझी’ किंवा ‘माझा मित्र’ आहेस तर ‘त्याच्याशी ’ किंवा ‘तीच्याशी’ मैत्री करू नकोस नाहीतर आपली मैत्री तुटली असा ‘इगो’ ही डोकावत असतो. किंवा तो रोज चहा पाजतो म्हणून त्याच्याशी मैत्री असेही प्रकार पाहावयास मिळतात. मैत्री नसलेला व्यक्ती आज जगात तरी शोधून सापडणार नाही.

घराबाहेर वावरतांना आपले भले चिंतणारा एक तरी सोबती हवा वाटत असतो. या गरजेतूनच मैत्रीचे बंध जुळत असतात. मैत्रीतून केवळ दोन जण जुळतातच असे नाही तर त्या दोघांची कुटूंबेही जुळतात. कधी या कुटूंबांचे नात्यातही रूपांतर होत असते. असे म्हणतात की खरे मित्र नेहमीच ऐकमेकांचे भले चिंतीत असतात. परंतू अशी मैत्री बोटावर मोजता येईल एवढीच असते.

महाविद्यालयीन जीवनात चित्रपटात रमणारी तरूणाई जेव्हा उत्सुकता म्हणून व्यसनांच्या आहारी जाऊ लागते तेव्हा खर्‍या मित्राचे काम सुरू होते. व्यसनांच्या आहारी जाणार्‍या मित्राला व्यसनांपासून दूर करणे. किंबहुना कोणत्याही प्रकारचे दुर्व्यसन लागू नये आणि आईवडीलांसह स्वत:चे करीअरच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणारी मैत्री खरी मैत्री असते.
मित्रामुळे जीव वाचल्याच्या आणि मित्रामुळे जीव गेल्याच्या घटना आपण वाचत असतो. तेव्हा मात्र मैत्रीबाबत चिंता वाटते. मैत्री म्हणजे जीवाचे मैतर. ती कधीच धोका देणारी नसते. तर ती धोक्यांपासून वाचवणारी असते.

शाळा, महाविद्यालय, नोकरी, विवाह, मुले आणि निवृत्ती अशा आयुष्याच्या विविध टप्प्यांवर मैत्र आणि मैत्रिणी बदलत जातात. पण काही मित्र हे मात्र कधीच बदलत नाहीत. ते म्हणजे आईवडील आणि नवरा बायको. विवाहानंतर पती-पत्नीत जर मित्र आणि मैत्रिणीचे नाते तयार झाले तर आज पती पत्नीत होणारा बेबनाव होणारच नाही. कारण पती पत्नी या नात्यात कितीही केले तरी या दोघांचा ‘ इगो’ कधीतरी दुखावत असतो.

परंतू मित्रत्वाच्या नात्यात ‘ इगो’ नसतोच. तर तेथे समजुन सांगण्याचे आणि समजून घेण्याची मानसिकता असते. आजही असे अनेक मित्र मैत्रिणी आहेत की ते बाहेरगावी असले तरी आजच्या मोबाईल नामक मित्रामुळे ते जोडलेले आहेत. कधीकाळी एकाच वर्गात बसणारे, सहलीला सोबत जाणारे,कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सोबत चहा घेणारे मित्र मैत्रिणी आज विवाहपश्चात दुर असले तरी त्यांच्यातील निखळ मैत्री त्याच्या जोडीदारालाही मंजुर होत असते.

कारण काय तर त्यांना त्यांच्या व्यवसायात, आवडीनिवडीत ते करत असलेली मदत. हो पण ही मदत स्वार्थी नसतेच. असे असले तरी कधी कधी व्यावसायीक यशामुळे म्हणा की अन्य कारणांमुळे म्हणा मनात ‘इगो’ डोकावतो म्हणा किंवा अजून अन्य कोणत्यातरी कारणांमुळे ते जरा चार हात लांबच राहत असतात. अशा वेळी मात्र कॉलेजच्या दिवसांतील मैत्री पर्वाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

वय, पैसा, प्रतिष्ठा यामुळे भलेही व्यक्तीच्या मनात एक वेगळ्या प्रकारचा ‘ इगो’ निर्माण झालेला असला तरी खर्‍या मैत्रीपुढे तो कधीतरी नष्ट होत असतो. जेव्हा नष्ट होतो तेव्हा मात्र वेळ संपलेली असते. मैत्री मित्राच्या प्रगतीत कधीच बाधा आणत नाही. उलट येणार्‍या अडचणी सोडवल्या जातात.

कोणी कितीही म्हणा आजही मैत्रीत काही प्रमाणात स्वार्थीपणाची झलक दिसून येते. स्वत:चे काम असले की त्या मित्राला मदतीसाठी याचना केली जाते. काम झाले की तु कोण नी मी कोण ? असाही अनुभव घेत असतो. यातूनही जर मदत करणार्‍या मित्राने त्या मित्राकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली तर वेळेचे किंवा अन्य कारणांची सरबत्ती सुरू होते. मग ही खरी मैत्री कशी असू शकते.?

मैत्रीच्या अशा विविध रंगात रंगुनही मैत्री हवी असते. पण या सर्वात महत्वाची मैत्री आहे ती कौटूंबिक मैत्री. पती पत्नी, सासु सासरे यांच्यातील मैत्री. कारण घराबाहेरच्या मैत्रीला मर्यादा असतात. परंतू कौटुंबिक मैत्रीला अशा कोणत्याच मर्यादा नसतात. तेथे फक्त आणि फक्त कुटूंबाचे भले कसे होईल, तुमची दू:खे कशी दूर होतील याचा नी याचाच विचार होत असतो. पण आज नेमके हेच होतांना दिसत नाही. आजच्या मैत्री दिनी याबाबतचा विचार मनात रूजावा. याच मैत्री दिनाच्या शुभेच्छा. !

LEAVE A REPLY

*