गुजरातच्या अल्पवयीन तरुणीला पळविणार्‍या जळगावच्या तरुणास अटक

0

जळगाव । दि.16 । प्रतिनिधी-फेसबुकच्या माध्यमातून गुजरात येथील अल्पवयीन तरुणीशी ओळख करून तिला जळगाव येथे पळून येणास सांगणार्या जळगाव येथील तरुणाविरुध्द गुजरात येथील केशोद पोलिसात पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी गुजरात येथील केशोद पेालिसांनी जिल्हापेठ पोलिसांच्या मदतीने या तरुणाला जळगावातील प्रेमनगर येथून ताब्यात घेतले. या तरुणाला घेवून केशोद येथील पोलिस गुजरातकडे रवाना झाले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रेमनगरमधील तेजस जोगी वय 20 या तरुणाने फेसबुकच्या माध्यमातून गुजरातमधील केशोद येथील 13 वर्षीय तरुणीशी ओळख केली.

त्यानंतर तिचा मोबाईल नंबर मिळवून तिच्याशी व्हॅाटसअप चॅटींग सुरु करून जवळीक साधली. त्यानंतर दोघांचे फोनवर बोलणे सुरु झाले. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याने दरम्यान दोघांनी पळून जाण्याचे ठरविले.

आठ दिवसांपूर्वी ही 13 वर्षीय तरुणी मित्र तेजस याच्या सांगण्यावरून आपल्या घरून काही पैसे घेवून पळून गेली. वडीलांनी तात्काळ पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून तिला अहमदाबाद येथून ताब्यात घेतले.

याप्रकरणी या तरुणीच्या वडीलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून तेजस संजय जोगी वय 20 रा. प्रेमनगर यांच्या विरुध्द केशोद पोलिसात भादवी कलम 363,366 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी केशोद पोलिसांनी जळगाव येवून जिल्हापेठ पोलिसांशी संपर्क साधला. जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी अल्पाफ पठाण, नाना तायडे यांनी तपास करून आज सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास नोकरी निमित्त बोलवून त्याला ताब्यात घेतले. तेजसला घेवून केशोद पोलिस गुजरातकडे रवाना झाले आहे.

LEAVE A REPLY

*