हा ‘सदमा’ कसा झेलायचा?

0
वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी प्रौढ भूमिका साकारणार्‍या श्रीदेवीने प्रौढपणी लहान मुलीची भूमिका तितक्याच ताकदीने साकारली. मोठ्या कालखंडानंतर तिचे रुपेरी पडद्यावर पुनरागमन झाले होते. व्यक्तिरेखेच्या विविध छटा लिलया साकारणारी ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीला आणखीही बरेच काही देणार होती. तिचे अकाली जाणे हा तिच्या चाहत्यांसाठी
मोठा ‘सदमा’ आहे आणि त्यातून लवकर सावरणे रसिकांना शक्य नाही.

‘श्रीदेवीच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी…’ अशी कॅचलाईन चित्रपटाच्या जाहिरातीत छापून येत होती आणि ती खरीही ठरली होती. वर्ष होते 1983 आणि चित्रपट होता ‘हिंमतवाला’. गोबर्‍या गालांच्या, मोठ्या डोळ्यांच्या ग्लॅमरस श्रीदेवीला पाहण्यासाठी थिएटरवर अक्षरशः तुफान गर्दी उसळली होती. तद्दन मसालापट असलेल्या या चित्रपटाची नायिका मात्र केवळ शोभेची बाहुली म्हणून रूपेरी पडद्यावर आलेली नाही, हे त्याचवेळी सर्वांना तिच्या डोळ्यातली चमक बघून पुरेपूर जाणवले होते. चित्रपटातली गाणी, नृत्ये धुमाकूळ घालत होती; पण अगदी छोट्या-छोट्या प्रसंगातही अभिनयातले बारकावे दाखवून देणारी श्रीदेवी मोठा पल्ला गाठणार हे तेव्हाच निश्चित झाले होते. तसे पाहायला गेले तर ‘हिंमतवाला’ हा काही तिचा पहिला हिंदी चित्रपट नव्हे. ‘सोलहवा सावन’मध्ये (1978) ती पडद्यावर येऊन गेली होती, परंतु तो चित्रपट फारसा यशस्वी ठरला नव्हता. ‘हिंमतवाला’ने मात्र श्रीदेवीच्या कारकीर्दीला अचानक रॉकेटचा वेग दिला. दाक्षिणात्य अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याची ती पहिलीच वेळ नव्हती; पण त्याकाळी अशा अभिनेत्रींची संख्याही फार नव्हती. मोठे, आकर्षक सेट, विनोदाची फोडणी, गाणी-नृत्यांचा भरपूर मसाला यामुळे पद्मालया प्रॉडक्शनचा ‘हिंमतवाला’ सुपरहिट ठरला आणि ही दाक्षिणात्य अभिनेत्री हिंदी चित्रपट रसिकांच्या गळ्यातली ताईत बनली. हिंदीतली पहिली ‘स्त्री सुपरस्टार’ ठरली.

श्रीदेवी… मूळ नाव श्री अम्मा यांगर अय्यप्पन. 13 ऑगस्ट 1963 चा जन्म आणि 24 फेब्रुवारी 2018 पर्यंतचे आयुष्य. अवघे 54 वर्षांचे. शनिवारी रात्री उशिरा तिच्या निधनाचे वृत्त आले तेव्हा कुणाचा विश्वासही बसला नाही. ती अत्यवस्थ आहे का, अशी विचारणा करणारे मेसेज रात्री दोनच्या सुमारास फिरू लागले. प्रचंड अंगभूत ताकद असणारी ही ग्लॅमरस अभिनेत्री सर्वांना एवढा मोठा ‘सदमा’ देऊन या जगातून निघून जाईल यावर कुणाचा विश्वासच बसत नव्हता. परंतु पहाटेच्या सुमारास बातमी पक्की झाली. दुबईत एका लग्नसमारंभासाठी दाखल झालेल्या श्रीदेवीला तिथेच हृदयविकाराचा झटका आला आणि तिने अखेरचा श्वास घेतला. फार कमी आयुष्य लाभले; पण त्यातली बहुतांश वर्षे रुपेरी पडद्यावरच व्यतीत झाली. तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमधून तिने असंख्य चित्रपट गाजवले. बाल अभिनेत्री म्हणून ती 1975 मध्येच सर्वप्रथम बॉलिवूडमधल्या ‘ज्युली’ चित्रपटात झळकली. विशेष म्हणजे पहिली ‘प्रौढ’ भूमिका करण्याची संधी तिला वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच मिळाली. 1976 मध्ये मुंद्रू मुदिचू या तमिळ चित्रपटाद्वारे किशोरवयातच अभिनयातली परिपक्वता तिने दाखवून दिली. लवकरच तेलगू आणि तमिळ चित्रपटात एक आघाडीची नायिका म्हणून ती परिचित झाली. सिगप्पू रोजक्कल, वारुमयीन निरम सिवप्पू, अखारी पोराट्टम, जगदेका वीरुडू अतिलोक सुंदरी, क्षणक्षणम् अशा दाक्षिणात्य चित्रपटांमधील तिच्या भूमिकांनी रसिकांचे मन जिंकले.

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘हिंमतवाला’ प्रदर्शित झाल्यावर श्रीदेवीला मागे वळून पाहावेच लागले नाही. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट तिच्या नावावर नोंदवले गेले. 1983 चा ‘मवाली’, 1984 चा ‘तोहफा’, ‘मकसद’ आणि ‘नया कदम’ हे असे चित्रपट होते जे कथानकासाठी पाहिले गेलेच नाहीत. हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळा ट्रेंड निर्माण करणारे हे चित्रपट भरभरून करमणूक करणारे मसालापट होते. भव्यता, विनोदांची पेरणी, मारधाड आणि भव्य सेट असा हुकमी फॉर्म्युला या चित्रपटांमध्ये वापरला गेला होता. वस्तूतः नायिकेला फारसे महत्त्व नसलेले (तोहफाचा अपवाद) हे चित्रपट होते. मात्र श्रीदेवीने आपल्या हुकमी अदांनी स्वतःची ओळख अशा चित्रपटांमधूनही निर्माण केली आणि कायम राखली. केवळ अभिनेत्रीसाठी चित्रपट पाहणारा वर्ग तिने निर्माण केला. श्रीदेवीचे सौंदर्यच केवळ त्यासाठी कारणीभूत होते का, या प्रश्नाचे उत्तर निश्चितच नकारार्थी द्यावे लागेल. कारण असे एकाच धाटणीचे चित्रपट तयार करताना प्रत्येक वेळी वेगळी सौंदर्यवती पडद्यावर आणणे निर्मात्यांना शक्य होते. श्रीदेवीची ताकद सामावली होती ती तिच्या मोहक चेहर्‍यावर उमटणार्‍या आणि क्षणोक्षणी बदलणार्‍या विविध छटांमध्ये. कमालीचे सुंदर डोळे असणार्‍या श्रीदेवीने त्या डोळ्यांचा तितक्याच खुबीने वापर केला. तिचा अभिनय जितका रसरशीत तितकाच सखोल आहे, हे तिच्या डोळ्यांमधूनच उलगडत जायचे. प्रत्येक भावनेचा आविष्कार सर्वप्रथम डोळ्यांमध्ये होतो, नंतर चेहरा बदलतो आणि शब्द सर्वांत शेवटी प्रतिक्रिया देतात. शब्द हा भावनेचा अंतिम आविष्कार असतो. आधी ती भावना डोळ्यांमध्ये उमटावी लागते. श्रीदेवीच्या अभिनयात हा क्रम नेहमी दिसून आला. मसालापटांमध्ये थोडेबहुत नाचता आले तरी काम भागते, असा सरधोपट विचार श्रीदेवीने कधीच केला नाही. उलट नायिकेला फारसा वाव नसलेल्या चित्रपटांमधून स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनय अत्यंत छोट्या-छोट्या गोष्टींमधून पेरता येतो, हे तिने दाखवून दिले.

‘मास्टरजी’ (1985) आणि ‘नजराना’ (1986) फारसे यशस्वी ठरले नाहीत. मात्र 1987 मध्ये शेखर कपूर दिग्दर्शित ‘मिस्टर इंडिया’ने रेकॉर्ड ब्रेक गर्दी खेचली. फॅण्टसीच्या अंगाने जाणारा हा चित्रपट जितका मनोरंजक तितकाच कलात्मक होता. या चित्रपटातले श्रीदेवीचे ‘हवाहवाई’ हे नृत्य जितके लक्ष वेधून घेणारे ठरले तितकाच तिचा अभिनयही लक्षवेधी ठरला. लहान मुलांचा दंगा सहन न होणारी, शांतताप्रिय महिला पत्रकार मुलांच्या गराड्यात अडकल्यावर तिचा कसा तीळपापड होतो, हे दाखवावे तर श्रीदेवीनेच. या चित्रपटात मुलांचा फुटबॉल तिने जप्त केल्यानंतर मुलांनी गायिलेल्या दंगलगाण्यात तिने दाखवलेला वैताग बघण्याजोगा होता आणि शेवटी जेव्हा ती अंगात आल्याप्रमाणे घुमू लागते तेव्हा तर टाळ्याच पडल्या. अदृश्य मिस्टर इंडियाशी तिने साधलेला संवाद, त्याच्याबरोबरचा प्रणय आणि बघितलेल्या (न बघितलेल्या) मिस्टर इंडियाविषयी वृत्तपत्राच्या संपादकाशी बोलताना तिने दाखवलेली व्हरायटी या बाबी केवळ श्रीदेवीच करू जाणे. सौंदर्यवतींनी रुपेरी पडद्यावर यावे, बहारदार नृत्ये सादर करावीत, अदांनी प्रेक्षकांना घायाळ करावे; पण अभिनयाच्या वाट्याला जाऊ नये, असे मानले जाण्याच्या काळात (आजही फारसा फरक नाही) श्रीदेवी उत्तम अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली आणि पुढील पिढीच्या अभिनेत्रींसमोर एक आदर्श ठेवला.

श्रीदेवीच्या ‘सदमा’विषयी स्वतंत्रपणेच बोलले पाहिजे. 1983 मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसनबरोबर तिच्या अभिनयाची जुगलबंदी सादर करणारा हा देखणा चित्रपट पडद्यावर आला. अभिनयातल्या वैविध्याबद्दल प्रसिद्ध असलेला कमल हसन हा आघाडीचा अभिनेता. विशेषतः भावनिक प्रसंग साकारताना अभिनयाच्या बाबतीत कमल हसनच्या आजूबाजूलाही कुणी फिरकू शकत नाही. अशा अभिनेत्यासमोर एका ‘अ‍ॅबनॉर्मल’ मुलीची भूमिका साकारणे हे श्रीदेवीसाठी प्रचंड मोठे आव्हान होते. अपघातात स्मृती गमावलेली तरुणी लहानपणीच्या घटनांव्यतिरिक्त काहीही आठवू शकत नाही. तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होतो. ती नको त्या ठिकाणी पोहोचते आणि तिथून एक शिक्षक तिला सोडवून आणून आपल्या नोकरीच्या ठिकणी घेऊन जातो. लहान मुलीसारखा सांभाळ करतो आणि तीही लहान बनूनच त्याच्यासोबत राहते, असे ढोबळ कथानक असलेल्या या चित्रपटात श्रीदेवीने अक्षरशः कमाल केलीय. लहानपणीच प्रौढ भूमिका करणार्‍या श्रीदेवीला या चित्रपटात प्रौढपणी लहान मुलीची भूमिका करावी लागली आणि ती तिने ज्या ताकदीने वठवली ते पाहून भल्याभल्यांनी बोटे तोंडात घातली. तिचा अल्लडपणा, अवखळपणा, खोडकरपणा दाखवायला पडदा पुरला नव्हता. शेवटच्या प्रसंगात पुन्हा पोक्त झालेली, कमल हसनला न ओळखणारी आणि त्याच्याकडे विस्मयाने पाहणारी श्रीदेवी आजही डोळ्यांसमोरून जात नाही.

‘नगिना’, ‘निगाहें’ यांसारखे पठडीबाज चित्रपट असोत किंवा ‘चालबाज’सारखी धम्माल डबल रोल कॉमेडी, श्रीदेवी तेवढ्याच सहजतेने वावरली. ‘खुदा गवाह’, ‘लाडला’ यांसारख्या नायकप्रधान चित्रपटांत तिने स्वतःचे स्थान दुय्यम राहू दिले नाही. ‘चांदनी’मधील श्रीदेवी विसरणे तर अशक्यच. ‘जुदाई’मध्ये श्रीमंतीच्या हव्यासाने वेडीपिशी झालेली स्त्री आणि श्रीमंतीपायी सर्वस्व गमावून बसल्यावर पश्चात्तापदग्ध झालेली स्त्री या दोन्ही विरुद्ध छटा दाखवताना ती कुठेच कमी पडली नाही. फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री आदी मानसन्मान तिला मिळालेच; पण सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे तिला मिळालेले रसिकांचे उदंड प्रेम. पहिली स्त्री सुपरस्टार म्हणून कायम कोरले गेलेले नाव. लग्नानंतर बराच कालावधी गेला आणि तिने ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. ‘मॉम’ हा तिचा शेवटचा चित्रपट ठरला. श्रीदेवी गेली हे खरे वाटत नाहीच, मात्र ती ‘उरलीय’ हे मात्र नक्की. वाढत्या वयोमानानुसार तिने आणखीही अनेक उत्तमोत्तम व्यक्तिरेखा साकारल्या असत्या. अभिनयाच्या आणखीही छटा दाखवल्या असत्या. अशा गुणी अभिनेत्रीचे आकस्मात जाणे हा तिच्या चाहत्यांना ‘सदमा’ आहे आणि रसिक त्यातून लवकर सावरू शकतील, असे वाटत नाही.
– मानवेंद्र उपाध्याय, सिनेसमीक्षक

LEAVE A REPLY

*