राष्ट्रवादी हल्लाबोल यात्रेचे आज जिल्ह्यात आगमन

0
जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यातील भाजपा सरकारविरोधात काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेचे उद्या दि. 19 रोजी जिल्ह्यात आगमन होणार आहे. दि. 19 ते 21 फेबु्रवारीपर्यंत म्हणजेच तीन दिवस या यात्रेचा जिल्ह्यात तीन दिवस मुक्काम राहणार आहे.

कर्जमाफी, शेतमालाला भाव, कापसावरील बोंडअळीमुळे झालेले नुकसान, शेतकर्‍यांवर असलेले आर्थिक संकट, विद्यार्थ्यांच्या समस्या, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार यासह विविध मागण्यांसाठी सरकारवर हल्लाबोल करण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्रीगोंदा ते नाशिक अशी हल्लाबोल यात्रा काढली जात आहे. या हल्लाबोल यात्रेचे उद्या दि. 19 रोजी जळगाव जिल्ह्यात आगमन होत आहे.

या यात्रेत विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे,माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार, प्रांताध्यक्ष आ. सुनिल तटकरे, जिल्ह्याचे प्रभारी आ. दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवकचे संग्राम कोतेपाटील, विद्यार्थी आघाडीचे अजिंक्य राणा, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांच्यासह प्रदेश पदाधिकारी सहभागी होणार आहे.

यात्रेचा तीन दिवस जिल्ह्यात मुक्काम
उद्या दि. 19 रोजी स. 11 वा. अमळनेर, दु. 3 वा. चोपडा, सायंकाळी 6 वा. पारोळा याठिकाणी जाहीर सभा होणार आहे. दि. 20 रोजी स. 11वा. रावेर, दु.3 वा. बोदवड, सायंकाळी 6.30 वा. जामनेर, दि. 21 रोजी स. 10 वा. धरणगाव, दु. 3 वा. पाचोरा, सायंकाळी 7 वा. चाळीसगाव याठिकाणी जाहीर सभा होणार आहे. तब्बल तीन दिवस या यात्रेचा जिल्ह्यात मुक्काम राहणार आहे.

धरणगावच्या सभेसाठी जय्यत तयारी
दि. 21 रोजी स. 10 वा. हल्लाबोल यात्रा धरणगाव येथे येणार असुन या यात्रेसाठी जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आज पत्रकार परीषदेत दिली. राज्यातील जनतेची या भाजपा सरकारने फसवणूक केली असल्याचा आरोप गुलाबराव देवकर यांनी केला. सभेच्या निमीत्ताने ठिकठिकाणी घेण्यात येणार्‍या कॉर्नर सभांमधुन जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

धरणगावची सभा ऐतिहासिक होईल असा विश्वासही गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केला. यात्रेचे स्वागत करण्यासाठी पाळधी येथे 1 हजार मोटार सायकलींची रॅली काढण्यात येणार आहे. तसेच पिंप्री येथेही रॅली काढुन यात्रेचे स्वागत केले जाईल. ही रॅली धरणगाव येथे सभास्थळापर्यंत जाणार असुन त्याठिकाणी रॅलीचा समारोप होणार आहे. धरणगावच्या सभेला किमान 15 ते 20 हजार नागरीक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघातील जनतेने या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहनही माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले. यावेळी पत्रकार परीषदेस वाल्मीक पाटील, संजय चव्हाण, अजय सोनवणे, विलास पाटील, योगेश देसले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*