पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांना यश : स्विस बँकेतील काळा पैसा भारतात येणार!

0

नवी दिल्ली |  वृत्तसंस्था :  स्विस बँकेत आपला काळा पैसा ठेवून निवांत बसलेल्या सगळ्याचींच झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. कारण स्विस बँकेत ज्यांचे अकाऊंट आहे आणि ज्यांनी आपला काळा पैसा या खात्यांमध्ये जमा केला आहे ती सगळी माहिती भारत सरकारला देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

स्वित्झर्लंड सरकारसोबत झालेल्या ऑटोमॅटिक सूचना आदान-प्रदान करारामुळे स्विस बँकेत पैसा जमा केलेल्या भारतीय व्यक्तींच्या खात्याची गोपनीय माहिती आता केंद्र सरकारला मिळू शकणार आहे.

या करारामुळे काळा पैसा बाळगणार्‍यांचे धाबे दणाणणार हे निश्‍चित आहे कारण या खात्यांसंदर्भातली माहिती सातत्याने स्वित्झर्लंड सरकार भारताकडे पाठविणार आहे. भारतासोबत झालेल्या आर्थिक खात्यांच्या माहितीसंदर्भातल्या आदान-प्रदान करारामुळे हे स्पष्ट होणार आहे. स्वित्झर्लंड सरकारने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेत यासंदर्भातला विस्तृत अहवाल मांडण्यात आला आहे.

स्वित्झर्लंडसोबतच भारताने इतर ४० देशांसोबत माहिती आदान- प्रदान करण्याचे करार केले आहेत. ज्या करारांप्रमाणे भारतीय लोकांची बँक खाती, त्यांची नावे आणि इतर महत्त्वाचे तपशील भारताला मिळू शकणार आहेत.

स्वित्झर्लंड सरकार यासंदर्भातला एक कायदाच तयार करणार आहे आणि त्याद्वारे भारतीयांची कोणती खाती स्विस बँकेत आहेत? त्यात किती पैसा आहे? हा पैसा बाळगणारे खातेदार नेमके कोण आहेत? ही सगळी माहिती केंद्र सरकारकडे सुपूर्द करणार आहे.

काळा पैसा भारतात आणण्याची चर्चा २०१४ पासून सुरु आहे कारण हेच आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान केलेल्या भाषणांमध्ये आणि त्यानंतरही अनेकदा दिले आहे. त्यामुळे विदेशात असलेला काळा पैसा भारतात आणण्याचे आव्हान मोदी सरकारपुढे आहे.

या आव्हानाला तोंड देण्यासाठी आता मोदी सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. दरम्यान स्वित्झर्लंडसह ज्या ४० देशांसोबत करार करण्यात आला आहे त्या सगळ्यांसोबतच माहितीची देवाण-घेवाण होणार आहे ‘ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन’ असे या कराराचे नाव असून यावर स्वित्झर्लंडच्या मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे.

२०१८ पासून माहिती देवाण-घेवाण करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचा आदेश स्वित्झर्लंड सरकारने दिला आहे, ज्यानंतर एक वर्षानी म्हणजेच २०१९ पासून काळा पैसा बाळगलेल्या सगळ्या भारतीयांची नावे केंद्राकडे यायला सुरुवात होणार आहे.

भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काळा पैसा’ भारतात येण्यासाठी अनेक प्रयत्न केले. सत्तेत येण्यापूर्वी प्रत्येक सभेत या मुद्यावरुन त्यांनी रान पेटविले होते. त्यामुळे केंद्रात सत्तेत येताच अनेक कठोर कायदे करण्याचा प्रयत्न केला.

मात्र आंतरराष्ट्रीयस्तरावर विविध अडचणी येत असतांना स्वित्झर्लंडने मात्र मोदींच्या या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीयस्तरावर संपर्क साधत असतांनाच मोदींनी देशांतर्गतदेखील अनेक बदल केले.

यात नोटबंदीचा मुद्दा महत्त्वाचा मानला जातो. नोटबंदीनंतर अनेकांची पंचाईत झाली असून आजही अनेकांजवळ जुन्या नोटा पडून असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

त्यातच आता स्वित्झर्लंडने भारताला सहकार्य करण्याचे जाहीर केल्याने मोदींच्या प्रयत्नांना मोठे यश आल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

*