आयुष्यभरासाठी …

0
ज्येष्ठ साहित्यिक ना.सी.फडके यांनी ‘खरा मित्र सूर्यासारखा असावा’ असे म्हटले आहे. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या प्रकाशमय वाटेकडे बोट धरून नेणारे मित्र सध्याच्या काळात मिळणे दुर्मिळ योगायोग !
कारण स्वत:चा आत्मकेंद्री विचार करणार्‍या स्वार्थी आणि चंगळवादी संस्कृतीत जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तरीही मैत्रीदिनांचा उत्साह आणि आनंद दरवर्षी निराळाच असतो.

अनेक वर्षे होवूनही ही मैत्रीची जादू कायम आहे. याला अंत नाही. वयाची साठी पूर्ण केलेल्या एखाद्या ग्रहस्थांना त्यांच्या वर्गातल्या मुलांची नावे विचारा. ते ग्रहस्थ वर्गातल्या किमान दहा-पाच विद्यार्थी मित्रांची नावे त्यांच्या वडिलांच्या नावासह पाठ म्हणून दाखवतील.

त्याच ग्रहस्थांना गेल्या पाच वर्षात भेटलेल्या मित्रांची नावे विचारा. ते नक्की अडखळतील. यावर ज्येष्ठ तत्ववेत्ते जे.कृष्णमूर्ती म्हणतात. ‘मित्र निराळा आणि सोबती निराळा’ आपण ज्याला मित्र म्हणवतो, तो आपल्या मनाच्या आपल्या कप्प्यात प्रतिमारूपाने स्थिरावलेला असतो. तो खरा मित्र. बाकीचे सारे सोबती.

 

परवाच रद्दीच्या दुकानामध्ये काही जुने अंक चाळतांना मस्त ओळी वाचनात आल्या. शाळेत असतांना त्या ओळी आमच्या एका मित्राने फळ्यावर लिहिल्या होत्या.

‘मन माझे सरोवर
निर्मळ मैत्रीचे नीर
तव स्मृती नौका सुंदर
सदा तरंगे त्यावर’

शाळा-कॉलेजात कित्येक वर्षे एका बाकावर बसून टिंगल-टवाळ्या करणारे मित्र, ग्रंथालयात तासन्तास पुस्तकात डोकी खुपसून एकमेकांच्या मदतीने नोट्स काढणारे पुस्तकी किडे असलेले मित्र-मैत्रीणी तर कॅन्टीनमध्ये वर्षभर मित्राच्या खिशातल्या नोटांवर खाण्याची ऐश करणारा एखादा फुकट्या मित्र असतोच.

अशी ही मैत्रीची अजब दुनिया प्रत्येकाने अनुभवलेली असते. त्यामुळेच तर असे मित्र आयुष्यभरात जिवाभावाचे सखेसोबती होतात. शाळेत एकाच बाकावर बसून दहावीपर्यंत नांदणारे मित्र शिक्षण संपल्यानंतर कोणत्याही वयात एकमेकांच्या संदर्भात तितकेच हळवे राहतात.

हे हळवेपण अगदी टोपण नावासह कायम रहाते. वयाच्या साठीतही शाळेतला ‘पशा’ नावाचा मित्र त्या मित्राच्या नजरेतून ‘पशा’च रहातो. याला काय म्हणावे? वसंताचे ‘वशा’, मिलिंदचे ‘मिल्या’ प्रकाशचे ‘पक्या’, अभिजितचे ‘आभ्या’, पांडुरंगाचे ‘पांड्या’, ओंकारचे ‘ओंक्या’, अशी मित्रांची नावे तर वैशालीचे ‘वैशी’, मनीषाचे ‘मनी’ पद्मजाचे ‘पम्पी’, चित्राचे ‘चित्री’ अशी श्रेयनामावली अगदी अखेरपर्यंत कायम रहाते ही मंडळी कोणत्याही वयात वर्गातल्या एखाद्या मुलीविषयी आठवण काढून हास्य-विनोद करतील.

मैत्रीला कोणत्याही मापाने तोलता येत नाही. मोजता येत नाही. जी गोष्ट आई-वडिलांना आपण सांगू शकत नाही, अशी काही सिक्रेटस् आपण मित्र-मैत्रीणींबरोबर शेअर करतो. फक्त तारूण्यातच ह्या गोष्टी होत नाही तर वृध्दापकाळात मैत्रीची हे नाते अधिकच घट्ट होते.

वाढलेले वय, त्याबरोबरच होणारे आजार आणि त्याहीपेक्षा होणारी मानसिक तगमग कोणाजवळ तरी व्यक्त करण्यासाठी घराजवळच्या मंदिरात, बागेत भेटणारे समवयस्क मित्र-मैत्रिणींची मदत होते. मैत्री कुठेही, कधीही कोणाबरोबरही आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तीशी होऊ शकते.

कारण मैत्रीला कोणत्याही प्रकारच्या फुटपट्ट्यांची गरज नसते. शिकली सवरलेल्या माणसांची मुला-मुलींशी मैत्री असू शकते. मनाला कचरा चिकटलेली मंडळी याविषयी साशंकता व्यक्त करतात. पण वासनेच्या पलिकडे असलेल्या निखळ व निर्मळ मैत्रीच्या नात्याला ‘लेबल’ लावण्याचं का९९म करणं म्हणजे माणसातल्या हळवेपणावर डाग लावण्याचं काम आहे असे मानले जाते.

खर्‍या मैत्रीची अभिव्यक्ती अनुभवायला स्वत: एक चांगला माणूस असावं लागतं. हे महत्वाचे असते. शाळा-कॉलेजात मैत्रीचा बहर अधिक फुलतो. मौज-मजा, टिंगल-टवाळ्या, मस्करी करीत कट्ट्यावर तासन्तास रमणारे ग्रुप, कॉलेजच्या बाहेर एखाद्या टपरीवरचा कटिंग चहा आणि वडा-पाववर ताव मारत तास बुडवणारी टोळकी नेहमी पहायला मिळतात.

तास बुडवून बाहेर मजा मारण्यातला आनंद काही औरच असतो आणि तो त्या वयात प्रत्येकाने एकदा तरी अनुभवलेला असतो.

‘फ्रेंडशिप डे’ ची धमाल मस्ती करण्यासाठी हल्ली कॉलेजीयन तरूणाई नेहमी तयार असते. जुने-नवे मित्र-मैत्रिणी गोळा करून भेटवस्तू, फ्रेंडशिप बँड बांधून ‘मैत्री अखंड राहू दे’ असेच त्यांना सूचित करायचे असते हे झाले बाह्यरूप, पण आत तसाच झरा वहात असला म्हणजे झालं. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे

‘ आत आपुल्या झरा झुळझुळे निळा स्वच्छंद
जगणे म्हणजे उधळित जाणे हृदयातील आनंद’
असा आतला झरा वाहण्यासाठीचा हा मैत्रीचा दिवस.

याउलट खासगी संस्था, बँका किंवा कोणत्याही कंपनीत काम करणार्‍या एखाद्या व्यक्तीला त्याच्या कंपनीतल्या मित्राविषयी विचारलं तर सगळे ‘सहकारी’ आहेत असे उत्तर तो देईल. कारण कामाच्या ठिकाणी एखाद्यावर मित्रत्वाच्या नात्याने विश्‍वास ठेवून ज्यांच्याजवळ मनमोकळे बोलता यावे अशी व्यक्ती भेटणे तसे मुश्कील.

किंबहुना ती व्यक्ती आपल्या विषयीच्या गोष्टी एकाचे दोन करून कोणाला सांगेल की काय, अशी अनामिक भिती असते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी अजूनही ‘सहकारी’ मित्रत्वाने वागले जाते. मैत्रीमध्ये असते फक्त मित्रत्वाची निर्मळ भावना व असिम विश्‍वास.

गरीबी-श्रीमंती, पैसा, असूया, मत्सर, द्वेष यांना तिथे थारा नसतो. मात्र या विश्‍वासाला तडा गेल्यास मित्रत्वाची भावना क्षणात दुश्मनीत बदलू शकते. याची अनेक उदाहरणे आपल्याला आजुबाजूला पहायला मिळतील. आणि एका क्षणात मैत्रीचे नाते संपून गेल्याचे चित्रपटासारखे सीनही पहायला मिळतील.

म्हणून मैत्रीच्या नात्यात अधिक जपावा लागतो तो ‘विश्‍वास’. मैत्रीचे नाते असेच तरल, हळुवार आणि कधीकाळच्या मजामस्तीने फुलते, बहरते आणि आयुष्यभरासाठी टिकूनही राहते.

आजच्या सुपरफास्ट युगात मैत्रीही तितकीच ‘फास्ट’ झाली आहे, असे असले तरी ‘मैत्र जीवांचे’ सार्थ ठरवणारी मैत्रीतली भावना मात्र तशीच हळुवार आणि संवेदनशील आहे. त्याला काळाचे वेळेचे बंधन नाही.

‘ काही माणसं…
काही माणसं मैत्रीनं आपल्या खांद्यावर हात टाकतात नि आपल्या बेसावध क्षणी आपल्याला स्वत:चा खांदाच देऊन टाकतात.

काही माणसं वरनं ‘हापूस’ आंब्यासारखी दिसतात चवीनं त्यांचा स्वाद घ्यावा तर नेमकी गाठीला लागलेली असतात

काही माणस वरनं सुकलेल्या चिखलासारखी असतात जमीन कडक म्हणून पाय टाकावा तर आपल्याला आणखिणच आत खेचतात.

नि काही माणसं पिंपळाच्या पानासारखी असतात. त्यंची जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात जपावशी वाटतात .. आयुष्यभरासाठी’

LEAVE A REPLY

*