कर्जमाफीला ‘अंगठ्या’चा अडसर

0

बाबुलाल पाटील,कळमसरे, ता.अमळनेर । दि.5-राज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा केली आहे.

या योजने अंतर्गत कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांना ऑन लाईन अर्ज भरावा लागत आहे. अगठ्याचा ठसा स्कॅन केल्यानंतर दिल्यानंतरच हा अर्ज अपलोड होत आहे.

मात्र, 60-70 शेतात राबलेल्या हातांवरील रेषा आता नाहीशा झाल्यामुळे ‘अंगठा’ मॅच होत नाही. परिणामी वृध्द शेतकर्‍यांच्या ‘सन्माना’ची एैशीतैशी होत आहे.

अर्जच अपलोड होत नसल्याने ई-सुविधा केंद्रावरून त्यांना अपमानीत होवून अर्ज न भरताच माघारी परतावे लागत आहे. तांत्रिक अडचणीमुळे हे वृध्द शेतकरी कर्जमाफी पासून वंचित रहावे लागणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासनाने कर्जमाफी बाबत ऑनलाईन फार्म भरणे ई सुविधा केंद्रावर सुरु केले. ऑनलाईन फार्म भरण्यासाठी शेतकर्‍यांनी ‘ई’ सुविधा केंद्रावर किती पैसे द्यायचे? याबाबत शासनाचे कोणतेही निर्देश नसल्याने शंभर ते दोनशे रुपयांची शुल्क ‘ई’सुविधा केंद्रधारक शेतकर्‍यांकडून आकारत आहे.

पतीच्या नावाने कर्ज असले तरी पती-पत्नी दोघांनी फार्म भरुन देवून दोघांचा अंगठ्याचा ठसा घेतला जातो. त्यामुळे शेतीचे कामधंदे सोडून पती-पत्नीला शहरात कर्जमाफीचा फार्म भरण्यासाठी जावे लागते.

दिवसभर थांबून सुध्दा ‘ई’ सुविधा केेंद्रावर गर्दी असल्याने शेतकर्‍यांचा नंबर एकादिवसात लागत नाही. नंबर लागल्यानंतर सर्व माहितीचा भरणा केल्या नंतर शेवटी पती-पत्नीच्या अंगठ्याचे ठसे स्कॅन करून अर्ज अपलोड केला जातो.

ग्रामिण भागात आजही शेती कुटूंबातील मोठ्या माणसांच्या नावावर असल्याने बहुतांश शेतकर्‍यांचे वय 60 ते 70 वर्षे आहे. अशा शेतकर्‍यांचे शेतात काम केल्याने हस्तरेषाच नष्ट झाल्या आहेत.

परिणामी त्यांचा अंगठ्याचा ठसा उमटत नाही. परिणामी दिवसरात्र रांगेत उभे असणार्‍या वृध्द शेतकर्‍यांच्या पदरी ऐनवेळी ‘अंगठ्या’मुळे निराश होवून घरी परतावे लागत आहे.

जवळपास 70 टक्के जमीन वडील, आजोबा यांच्या नावावर असल्याने त्यांचा अंगठ्याचा ठसा न उमटल्याने ते कर्ज माफीचा फार्म भरण्यापासून वंचित राहण्याची भिती आता ग्रामिण भागात व्यक्त केली जात आहे.

ज्यांचा अंगठ्याचा ठसा कॉमप्युटरमध्ये उमटत नाही ते शासनाच्या कर्जमाफीपासून वंचित राहतील की काय? या प्रश्नाने वृध्द शेतकरी हैराण झाले आहेत.

शासनाने शेतकर्‍यांकडून ऑनलाईन ऐवजी ऑफ लाईन अर्ज भरुन घ्यावा, ज्यांच्या अंगठ्याचे ठसे उमटत नाही त्यांनी कर्ज माफीचा फॉर्म कसा भरावा? याबाबत सुधारीत आदेश द्यावेत आणि वृध्द शेतकर्‍यांच्या ‘सन्मान’ राखावा अशी मागणी होत आहे.

 

LEAVE A REPLY

*