बसच्या धडकेत कास्ट्राईब संंघटनेचे माजी अध्यक्ष ठार

0
जळगाव । दि.5 । प्रतिनिधी-जिल्हा परिषदेत कास्ट्राईबच्या बैठकीला दुचाकीने येत असतांना मागून भरधाव वेगाने येणार्‍या बसने जोरदार धडक दिली.
यात कास्ट्राईब संघटनेचे माजी अध्यक्ष भाऊराव सपकाळे यांचा मृत्यु झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास गोदावरी वैद्यकीय महाविद्यलयाजवळ घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नातेवाईकांकडून माहिती अशी की, भुसावळ मधील रानातला महादेव हुडको कॉलनीतील रहिवासी भाऊराव अभिमन्यु सपकाळे (वय 60) हे यावल येथे कक्षाधिकारी म्हणून कार्यरत होते.

दरम्यान ते दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांनी सेवानिवृत्ती नंतर आपला पूर्ण वेळ हा संघटनेच्या कामासाठी दिला होता.

आज भाऊराव सपकाळे व सेवानिवृत्त शिक्षक रमजान तडवी (रा. खिरोदा) हे मोटार सायकल (क्र. एमएच 19 बी.एल 2217) ने जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीला येत होते.

दरम्यान दुपारच्या सुमारास बैठकीला येत असतांना त्यांच्या मोटारसायकलला मागून भरधाव येणार्‍या मुक्ताईनगर डेपोतील मुक्ताईनगर- जळगाव या बस (एमएच 20, बीएल 2486) ने जोरदार धडक दिली.

या झालेल्या अपघातातील जखमींना जबर मार लागल्याने त्यांना नागरीकांनी तात्काळ जवळच असलेल्या गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

दरम्यान जखमींवर उपचार सुरु असतांना भाऊराव सपकाळे यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

तर रमजान तडवी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगीतले.

दरम्यान याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संघटनेच्या बैठकीला येत असतांना झाला अपघात
जिल्ह्यात कास्ट्राईब संघटनेचे कार्य वाढविण्यासाठी भाऊराव सपकाळे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांची संघटनेसाठी स्वत:ला झोकून दिले होते.

त्यांनी नेहमी कर्मचार्‍यांच्या प्रश्नांमध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये मध्यस्तीची भूमीका घेवून कर्मचार्‍यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.

दरम्यान आज संघटनेच्या बैठकीला येत असतांना त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने यात त्यांच्या दुर्देवी मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युची बातमी समजताच त्यांच्या मित्र परिवार व संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

 

LEAVE A REPLY

*