चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीत दोन पॅनलमध्ये लढत

0
चाळीसगाव | प्रतिनिधी :  चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पॅनल बनविण्यासाठी विद्यमान व माजी सदस्यांच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. निवडणूकीत दोन प्रमुख पॅनलमध्ये लढत होण्याची दाट शक्यता आहे.

यावेळी मतदानाचा अधिकार असलेले सभासदही जागृत झाले असून ऐन वेळेस निवडणूकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण होणार आहे.

मंगळवारी निवडणूक निर्णय आधिकार्‍यांनी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. दि. १० सप्टेंबर रोजी मतदान व दि. ११ रोजी मतमोजणी होईल. १९९२ च्या घटनेप्रमाणेच निवडणूक घेण्याचा निर्णय सत्ताधारी गटाने घेतला.

परंतू २०१७ च्या घटनेनुसार निवडणूक घेण्याची मागणी अनेक सभासदांची होती. यंदाही निवडणूक रंगतदार व चुरशीची होणार आहे. निवडणुकीत कोण कोणाच्या पॅनल पॅनलमध्ये कोणासमोर उभे राहतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या तीन वर्षांपासून चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीवरून वाद सुरू होता.

संचालक मंडळ जाणीवपूर्वक निवडणूक लांबवित असल्याचा आरोप होत होता. निवडणूक कोणत्या घटनेनुसार व्हावी या मुद्यावरून काही संचालक न्यायालयात देखील गेले होते. त्यावर न्यायालयाने ९० दिवसांच्या आत निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात येऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. शिक्षक व कर्मचारी भरती प्रक्रियेत आर्थिक हित जोपासणार्‍या काही संचालकांना यंदा सभासद मतदार पुन्हा निवडून देणार काय? असा प्रश्न निश्चितच आम जनतेला पडला आहे.

आजच्या घडीला तरी निवडणुकीत दोन पॅनल रिंगणात उतरतील असे चित्र आहे. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे ८ हजार ५०० सभासद आहेत. आता ह्या सभासदावर योग्य व्यक्तीना निवडून देऊन, संस्थेची मलिन झालेली प्रतिमा पुन्हा स्वच्छ करण्यांची जाबदारी येऊन ठेपली आहे.

LEAVE A REPLY

*