मृत्यूच्या दाखल्यासाठीही ‘आधार’ सक्ती

0

नवी दिल्ली । दि.4 । वृत्तसंस्था-आधार कार्डच्या अनिवार्यतेची व्यापकता केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने वाढवत आहे. पॅनकार्ड, सीमकार्डपासून सरकारी अनुदानापर्यंत ‘आधार’ सक्ती केल्यानंतर आता केंद्र सरकारने मृत्यूच्या दाखल्यासाठीही आधार कार्ड बंधनकारक केले आहे. 1 ऑक्टोबरपासून हा निर्णय अमलात येणार आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा आधारकार्ड क्रमांकदेखील मृत्यूचा दाखला काढताना द्यावा लागणार आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत येणार्‍या रजिस्ट्रार जनरल इंडियाने आज एक परिपत्रक काढून मृत्यूच्या दाखल्याबाबतच्या नव्या नियमाची माहिती दिली.

मृत्यूचा दाखला काढताना मृत व्यक्तीचा आधारकार्ड क्रमांक द्यावा लागणार आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही. तसेच त्या व्यक्तीविषयीची माहितीही सरकारकडे उपलब्ध राहील, असे सांगण्यात येत आहे.

आधार क्रमांक दिल्यानंतर मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी विविध कागदपत्रे सादर करण्याची गरज उरणार नाही, असेही संबंधित अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

मेघालय, आसाम आणि जम्मू काश्मीरवगळता देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी हा निर्णय लागू असेल. संबंधित यंत्रणांनी या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे रजिस्ट्रार जनरल इंडियाच्या परिपत्रकात म्हटले आहे.

यापुढे मृत्यूच्या दाखल्यासाठी अर्ज करणार्‍यांना मृत व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक किंवा ‘आधार’साठी केलेल्या अर्जाचा क्रमांक द्यावा लागणार आहे.

मृताच्या नावे ‘आधार कार्ड’ नसल्यास अर्जदाराला तसे प्रमाणपत्र द्यावे लागेल. त्यात मृत व्यक्तीकडे आधार कार्ड नसल्याची माहिती नमूद करावी लागणार आहे.

ठळक मुद्दे
*आधार क्रमांक दिल्यावर मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी इतर कागदपत्राची गरज नाही.
*मृताच्या नावे ‘आधार कार्ड’ नसल्यास अर्जदाराने तसे प्रमाणपत्र देणे आवश्यक.
*मेघालय, आसाम व जम्मू काश्मीरचा अपवाद.
*मृत व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर टळणार.

LEAVE A REPLY

*