Type to search

Breaking News आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्यासाठी रविवारी मतदान : प्रचार तोफा आज सायंकाळी थंडावणार

Share
नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी येत्या रविवारी मतदान होत आहे. या टप्प्यात मतदान होणाऱ्या ५९ पैकी ४४ जागा भाजपकडे असून त्या कायम राखण्याचे आव्हान त्या पक्षापुढे आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीचा भाजपला सामना करावा लागत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने आव्हान उभे केल्याच्या पाश्र्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कसोटी आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ मतदारसंघातील लढत अटीतटीची होणार आहे. येथे काँग्रेसनेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांची लढत भाजप उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग यांच्याशी होणार आहे. गुणा मतदारसंघात काँग्रेसनेते ज्योतीरादित्य सिंदिया यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण चांगल्या मताधिक्याने विजय मिळविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

उत्तर प्रदेशात मतदान होत असलेल्या १४ पैकी १२ मतदारसंघांमध्ये गेल्या वेळी भाजपचे खासदार निवडून आले होते. आझमगडमधून समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव, तर तर प्रतापगड मतदारसंघातून भाजपचा मित्र पक्ष ‘अपना दला’ने विजय मिळवला होता. फूलपूरमधून केशवप्रसाद मौर्य निवडून आले होते.

पण उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आला होता. समाजवादी पक्ष आणि बसप एकत्र येण्याची प्रक्रिया गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघांतील पोटनिवडणुकांपासून झाली होती.

हरयाणातील १० पैकी सात जागा गेल्या वेळी भाजपने जिंकल्या होत्या. दोन जागा भारतीय लोकदल तर एक जागा काँग्रेसने जिंकली होती. यंदा भाजप आणि काँग्रेस असा सामना होत आहे. लोकदलात फूट पडली आहे. त्यातून जननायक जनता पार्टी असा पक्ष जन्माला आला आहे. हरयाणा विधानसभेची निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपल्याने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासमोर आहे.

लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरी झाल्यास त्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. यामुळेच भाजपचे नेते अधिक सावध झाले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये रविवारी मतदान होत असलेल्या सर्व आठही जागा तृणमूल काँग्रेसकडे आहेत. भाजपने ममता बॅनर्जी यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.

दिल्लीतील सातही जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. दिल्लीत भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत असून, त्याचा फायदा भाजपलाच होऊ शकतो. दिल्लीत आघाडी करावी, असा प्रस्ताव आम आदमी पार्टीने काँग्रेसपुढे ठेवला होता, पण दिल्लीतील काँग्रेसनेत्यांनी त्यास नकार दिला होता.

मोदी-शहांची प्रतिष्ठा पणाला

सहाव्या टप्प्यात बिहार (८), हरयाणा (१०), झारखंड (४), मध्य प्रदेश (८), उत्तर प्रदेश (१४), पश्चिम बंगाल (८) आणि दिल्लीतील सात अशा ५९ मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान होत आहे. पाचव्याप्रमाणेच सहावा टप्पाही भाजपसाठी महत्त्वाचा आहे. या ५९ मतदारसंघांपैकी ४४ ठिकाणी भाजपचे खासदार आहेत. भाजपचे मित्रपक्ष लोकजनशक्ती आणि अपना दलाचे प्रत्येकी एक असे दोन खासदार आहेत. म्हणजेच ४६ जागा भाजप किंवा मित्र पक्षांकडे आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!