धरणगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या नियुक्तीसाठी सर्व पक्षियांची गांधीगीरी : खुर्चीला घातला हार

0
धरणगाव |  प्रतिनिधी :  शहरातील ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी डॉक्टर नसल्याने पुन्हा गोंधळ उडाला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी शहरातील सर्वपक्षीय आंदोलकांसह तीव्र संताप केल्याने वातावरण गंभीर बनले होते.

गुलाबराव वाघ यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भामरे, नासिक आरोग्यविभागीय आयुक्त यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आंदोलकांना शांत करण्यासाठी चर्चा केली. तसेच आज संध्याकाळ पर्यंत डॉक्टर उपलब्ध न झाल्यास उद्यापासून ग्रामीण रुग्णालय बंद करण्याचा इशारा देण्यात आला.

रूग्णालयाच्या प्रवेशव्दारावर रुग्णांसह आंदोलन करतांना योगेश वाघ व विनोद रोकडे.

यावेळी नगरसेवक वासुदेव चौधरी, विलास माळी, सामाजिक कार्यकर्ते योगेश वाघ, भाजपाचे गुलाब मराठे, मुन्ना लांबोळे, विनोद रोकडे, प्रशांत गांगुर्डे, अजय चव्हाण, कल्पेश महाजन, हेमंत मराठे, जितेंद्र धनगर व शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी झाली होती.

डॉक्टर नसल्याने रूग्णांची गैरसोय होत असल्याने नाराजी व्यक्त होत होतं. येथील ग्रामिण रूग्णालयात वैद्यकिय अधिकारी नसल्याने गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने आक्रमक भुमिका घेतली आहे. शिवसेनेचा ही भुमिका पाहून जिल्हा प्रशासन सुध्दा प्रचंड हादरले आहे.

परिणामी काही दिवसांपूर्वी डॉ.लिलाधर बोरसे यांची तडकाफडकी नियुक्ती केली होती. मात्र, डॉ.बोरसे यांनी नियुक्तीपत्र स्विकारून जिल्हा शल्यचिकित्सकांचा सन्मान राखला मात्र, दुसर्‍याच दिवशी त्यांनी कौटूंबिक जबाबदारी, अडचणीमुळे ही नियुक्ती स्विकारण्यास विनम्रपणे नकार दिला होता.

त्यानंतर ग्रामिण रूग्णालयातील रूग्ण पुन्हा वार्‍यावर होते. येथील ग्रामिण रूग्णालय म्हणजे फक्त इमारत असून डॉक्टरांसह इतरही कर्मचार्‍यांची येथे वाणवा आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी आता हा प्रश्‍न प्रतिष्ठेचा केला असून आज गांधीगिरीकरत वैद्यकिय अधिकार्‍याच्या रिक्त खुर्चीला हार घातला.

उद्यापासून डॉक्टर हजर न झाल्यास त्यांनी रूग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिल्यामुळे उद्या काय होते? डॉक्टर येतात की शिवसेना ग्रामिण रूग्णालयाला टाळे ठोकतात याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*