Thursday, April 25, 2024
Homeनगरशिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य : छिंदम विरोधात 60 पानी दोषारोपपत्र

शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य : छिंदम विरोधात 60 पानी दोषारोपपत्र

अहमदनगर|Ahmedagar

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम (वय- 35) याच्या विरोधात न्यायालयात 60 पानांचे दोषारोपपत्र तपासी अधिकारी सहायक निरीक्षक किरण सुरसे यांनी सोमवारी दाखल केले. यामध्ये एकुण सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहे.

- Advertisement -

धार्मिक भावना दुखावणे, दोन धर्मात तेड निर्माण करून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहचेल असे कृत्य करणे, असा ठपका छिंदमविरोधात ठेवण्यात आला आहे.

फेब्रुवारी 2018 मध्ये छिंदमने महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन करून वाद घातले होते. त्यावेळी छिंदमने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छिंदमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शासकीय पदावर असल्याकारणाने भादंवि कलम 196 (1) अ प्रमाणे तोफखाना पोलिसांनी गृह विभागाकडे दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मागितली होती. गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी यासाठी परवानगी दिल्यानंतर छिंदम विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिपमधील आवाज आणि छिंदमच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. ऑडीओ क्लिपमधील आवाज हा छिंदमचाच असल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. तो अहवाल देखील पोलिसांनी दोषारोपपत्रासोबत जोडलेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या