स्टेट बँकेचे गृहकर्ज व्याजदर कमी : जुन्या कर्जदारांना होणार फायदा

0
जळगाव | प्रतिनिधी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकांनाच हक्काचे घर मिळाले पाहिजे, असे जाहीर केले आहे. तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठीही पंतप्रधान आवास योजना लागू करण्यात आली आहे.

या विचारानेच स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहे. त्यामुळे आता जुन्या कर्जदार ग्राहकांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी जुन्या कर्जदार ग्राहकांना व्याजाच्या दरात बदल करुन घेण्यासाठी बँकेत जावून विहीत नमुना अर्ज भरुन द्यावा लागणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जाचा व्याज दर महिलांसाठी ०.२५ तर पुरुषांसाठी ०.२० टक्क्यांनी कमी केला आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

बँकेच्या संकेत स्थळावरील माहितीनुसार गृहकर्जासाठी ३० लाखापर्यंत ८.३५ व्याजदर महिलांसाठी तर ८.४० इतर. ३० ते ७५ लाखापर्यंत ८.५० व्याजदर महिलांसाठी तर ८.५५ इतर. ७५ लाखाच्या वर ८.६५ महिलांसाठी तर ८.७० इतरांसाठी व्याजदर राहिल.

१ लाख कर्ज घेतल्यास ७५८ रुपये दरमहा हप्ता भरावा लागणार आहे. गृहकर्जासाठी व्याजदर कमी केल्यामुळे कर्जदारांना विशेषत: महिला कर्जदारांना फायदा होणार आहे.

जुन्या कर्जदारांच्या  व्याजदरात होणार बदल

स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदर कमी केल्यामुळे नवीन कर्जदार ग्राहकांसह जुन्या कर्जदार ग्राहकांनी त्याचा लाभ होणार आहे. व्याजाच्या दरात बदल करुन देण्यासाठी स्टेट बँकेत जावून विहीत नमुन्यात अर्ज भरुन द्यावा लागणार आहे.

तसेच घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेनुसार त्यासाठी शुल्क देखील भरावी लागणार आहे. त्यानंतरच व्याजदरात बदल होवून जुन्या ग्राहकांना त्याचा फायदा होईल.

स्टेट बँकेच्या गृहकर्जावरील व्याजदर कमी झाले असले तरी बँकेला अद्यापर्यंत याबाबत अधिकृत पत्र प्राप्त झालेले नाही. पत्र प्राप्त झाल्यानंतर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. त्यानुसारच व्याजदर लागू होतील.
– चैतन्य राजे,  व्यवस्थापक, गृहकर्ज,
स्टेट बँक ऑफ इंडिया

LEAVE A REPLY

*