जिल्ह्यात ‘थॅलेसिमीया’चे ३०० रुग्ण

0

जळगाव |  रक्तातील प्रोटीनच्या साखळीपैकी एकाही साखळीत दोष आढळल्यास लाल रक्त पेशी असामान्य होत असल्याने ‘थॅलेसिमीया’चा आजार उद्भवतो. हा आजार अनुवंशिक असून जिल्ह्यात थॅलेसिमीयाचे तपासणी केलेले ३०० रुग्ण आढळून आले आहेत.

तपासणी न करणार्‍या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज देखील वैद्यकीय क्षेत्रात वर्तविण्यात येत आहे. बाधित रुग्णांना वेळेत रक्त न मिळाल्यास दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यात विशेषत: आदिवासी दुर्गम भागात बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

रक्ताच्या नात्यामध्ये विवाह झाल्यास किंवा पती-पत्नींमध्ये थॅलेसिमीयाची लक्षणे आढळल्यास त्यांच्या मुलांमध्ये थॅलेसिमीयाची लक्षणे दिसून येतात.

हा आजार अनुवंशिक असून जळगाव जिल्ह्यात ३०० रुग्ण आहेत. रुग्णांना दर महिन्याला रक्त द्यावा लागतो. बाधित रुग्णांना वेळेत रक्त न दिल्यास दगावण्याची शक्यता असते. थॅलेसिमीयाचे सर्वाधिक प्रमाण बालकांमध्ये आढळून येत आहेत. बालकांना दरमहिन्याला एक बॅग तर मोठ्यांना दोन बॅगज् रक्त दिले जाते.

शासकीय रुग्णालयासह इंडियन रेडक्रॉस सोसायटी, माधवराव गोळवलकर रक्तपेढी, जळगाव ब्लड बँक, गोदावरी फाऊंडेशन संचलित रक्तपेढीतर्फे बाधित रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि जि.प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे लोहवाढीची औषध देखील दिली जाते.

काय आहे ‘थॅलेसिमीया’ आजार ?

हिमोग्लोबीनमध्ये चार प्रोटीनच्या साखळी असतात. दोन अल्फा ग्लोबीन आणि दोन बीटा ग्लोबीन असतात. यापैकी एक जरी प्रोटीनमध्ये दोष आढळल्यास रक्तातील लाल पेशी असामान्य होवून थॅलेसिमीयाचा आजार होतो.

अल्फा ग्लोबीन साखळी शरीरातील ११ व्या गुणसुत्राशी तर बीटा ग्लोबीन साखळी १६ व्या गुणसुत्राशी संबंधित असतात. हा आजार अनुवंशिक असून नात्यामध्ये विवाह झाल्यास बाळाला थॅलेसिमीया होवू शकतो.

‘बोन मॅरो ट्रान्सप्लॉन्ट’ महागडी उपचार पद्धती

थॅलेसिमीया रुग्णांसाठी ‘बोन मॅरो ट्रान्सप्लॉन्ट’ उपचार पद्धतीचा अवलंब करणे हे एक पर्याय आहे. परंतु रक्तदात्याचे आणि रुग्णाची गुणसुत्र जुळणे अपेक्षित आहे. तरच बोन मॅरो ट्रान्सप्लॉन्ट करुन नवीन रक्तपेशी तयार करु शकतो.

ही उपचार पद्धती अतिशय महागडी असून तपासणी आणि उपचार पद्धतीला ३० ते ३५ लाखा पेक्षा अधिक खर्च येण्याची शक्यता असते. आदिवासी दुर्गम भागात आर्थिक परिस्थितीमुळे ही उपचार पद्धती करणे शक्य होत नसल्याने बालमृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे.

रुग्णांना निशुल्क रक्तपुरवठा

जिल्ह्यात थॅलेसिमीयाचे ३०० रुग्ण आहेत. रुग्णांना दर महिन्याला रक्त दिला जातो. वेळेत रक्त न दिल्यास दगावण्याची शक्यता असते.

रुग्णांना शासकीय रुग्णालयांसह रक्तपेढ्यांतर्फे निशुल्क रक्तपुरवठा केला जातो. रेडक्रॉस सोसायटीतर्फे १० वर्षात १ कोटी ४० लाख रुपये किमतीच्या ११ हजार रक्ताच्या पिशव्या आतापर्यंत निशुल्क दिल्या आहेत.

थॅलेसिमीयाची लक्षणे

* रक्त कमी होणे.
* बाळ आजारी पडणे
* ताप येणे.
* चेहर्‍यावर सुज येणे.
* पोट वाढणे.

कशी घ्यावी काळजी

* नातेसंबंधामध्ये विवाह करु नये.
* विवाहपूर्व रक्ताची तपासणी करणे.
* औषधपचार नियमित करावा.
* नियमित तपासणी करणे.

‘थॅलेसिमीया’ रुग्णांवर उपचार करण्यासाठी आठवड्यातील एक दिवस निश्‍चित करण्यात आला आहे. दर गुरुवारी रुग्णांची तपासणी केली जाते. तसेच त्यांना रक्त दिला जातो.
– डॉ.किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव.

‘थॅलेसिमीया’ आजारावर योग्य उपचार केल्यास रुग्ण जगू शकतो. या आजाराबाबत जनजागृती व्हायला पाहिजे. तसेच विवाहपुर्व रक्ताची तपासणी केली पाहिजे. थॅलेसिमीया रुग्णांना रेडक्रॉस सोसायटीतर्फे निशुल्क रक्त दिला जातो.

– डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, चेअरमन, इंडियन रेडक्रॉस  सोसायटी रक्तपेढी, जळगाव.

LEAVE A REPLY

*