छतावरील दगड झोक्यात पडल्याने दीड वर्षाच्या चिमुकल्याचा झोपेत मृत्यू

0

जळगाव |  प्रतिनिधी :  तांबापूर मधील अजमेरी गल्लीत असलेल्या पार्टीशनच्या घरावरील पत्र्यावर प्लास्टीकचा कागद टाकतांना बल्ली तुटल्याने छतावरील दगड झोक्यात झोपलेल्या दिड वर्षाच्या बालकाच्या छातीत पडल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत परिसरातील नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की,रऊफ पटेल यांचे तांबापुरातील अजमेरी गल्लीत पार्टीशनचे घर आहे. रऊफ पटेल यांची पत्नी साजीदाबी, आई मेहमुदबी, मुलगी हुमेरा व रोजमीन हे सर्व घरात जेवण करीत होते.

दुपारी रऊफ पटेल यांनी जेवण झाल्यानंतर पावसाचे पाणी घरात शिरू नये म्हणून पत्र्यावर प्लास्टीकचा कागद टाकण्यासाठी मागील बाजुने छतावर चढले. यावेळी छताची बल्ली अचानक तुटल्याने छतावरील पत्रे व दगड खाली कोसळले.

दुदैवाने याच बल्लीला त्यांचा लहान दिड वर्षाचा मुलगा असद याचा झोका बांधला होता. छतावरील पत्रे व दगड झोक्यात झोपलेल्या असदच्या छातीवर पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. काही वेळेतच त्याची प्राणज्योत मालावली.

बल्ली तुटल्याने असदचे वडील रऊफ पटेल देखील खाली पडले होते. जखमी अवस्थेत नागरिकांनी असदला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी असदला मृत घोषित केले.

असद एकलुता एक मुलगा

असद हा रऊफ पटेल यांचा एकलुता एक मुलगा होता. असद जन्मापासून नेहमी आजारी राहत होता. गेल्या दोन महिन्यापासून त्याची प्रकृती सुधारली होती. त्यामुळे कुटुबिंयामध्ये आनंदाचे वातावरण होते. आज दुपारी असदची आई साजीदाबी यांनी त्याला जेवण भरवुन त्याला झोपण्यासाठी झोक्यात टाकले होते. काही वेळातच ही दुदैवी घटना घडली.

जिल्हा रुग्णालयात कुटुंबियांचा आक्रोश

या घटनेनंतर नातेवाईक, परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. या दुदैवी घटनेमुळे कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालात मन हेलावणारा आक्रोश केला.

या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

LEAVE A REPLY

*