विचाराला कृतीची जोड मिळाल्यास घडतात चरित्रे : प्रा. जतीन मेढे  – ‘द्वारकाई’ फिरत्या व्याख्यानमालेतील समारोप

0
 भुसावळ- चरित्र केवळ सांगून मिळवता येत नाही तर विचाराला कृतीची जोड मिळाल्यावर चरित्रे घडतात अशी माणसे जगात इतिसहास घडवितात. विचार वाचविले नाही तर आपल्यातील शैतान प्रवृत्तीचा माणूस दिवसाढवळ्या आपला खून केल्याशिवाय राहणार नाही यासाठी विचार वाचविण्याची गरज आहे त्याकरीता विचाराला कृतीची जोड द्यावी असे प्रतिपादन प्रा. जतिन मेढे यांनी केले.
 येथील भुसावळ हायस्कूलमध्ये माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मातोश्री स्वर्गीय द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतीनिमित्त जय गणेश फाउंडेशनतर्फे आयोजित ‘द्वारकाई’ व्याख्यानमालेच्या समारोपीय तिसर्‍या पुष्पात ‘अशी घडतात चरित्रे’ या विषयावर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ हायस्कूलचे चेअरमन ए.एन.शुक्ल होते. प्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, जय गणेश जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विसपुते, जिल्हा साक्षरता समिती सदस्य गणेश फेगडे, साहित्यिक चंद्रकांत अंबाडे, जिवराम चौधरी, मुख्याध्यापक हितेंद्र धांडे, पर्यवेक्षक प्रमोद शुक्ल उपस्थित होते.
 प्रा. जतीन मेढे म्हणाले की, विचार वाढला पाहिजे. अशाचा विचारमालेचे सिंचन करण्यासाठी ही व्याख्यानमाला आपल्यापर्यंत आली आहे. हेच खरे विचारांचे सिंचन आहे. आपली लढाई पाण्याच्या संकटांशी, प्राणवायुच्या संबंधांशी आहे. विचारांची पुस्तके मस्तक विचारवंत होण्यासाठी वाचायची असतात. मी म्हणजे  देश आहे. मी जेवढा विचारवंत  होईल तेवढा माझा देश, राष्ट्र विचारवंत होईल याचा विचार करायाला हवा.
 छत्रपती शिवाजी महाराजांनी जनता व रयतेचे राज्य निर्मिती केली. जनता व रयत म्हणजे आपण. आपले राज्य म्हणजे आपण आपल्यासाठी निर्माण केेलेली व्यवस्था. ही व्यवस्था छत्रपती शिवाजी महराजांनी १७ व्या शतकात निर्माण केली.
 विद्यार्थ्यांच्या हातात कोणती पुस्तके आली.
कोणती पुस्तके यायला हवी हे विद्यार्थ्यांनी ठरवावे. विद्यार्थ्यांची शिक्षकांशी दोस्ती झाली पाहिजे. यात आदर्श व शिस्त असायला हवी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सन १९०७  मध्ये त्यांचे शिक्षक अर्जुन केळुुस्कर यांनी ‘बुद्ध चरित्र’ हे पुस्तक दिले होते. हे पुस्तक डॉ.बाबासाहेबांनी आयुष्याची लायब्ररी मस्तकात जपले होते. या पुस्तकाने त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविले. त्यांच्या लायब्ररीत सर्वात वरच्या जागी हे पुस्तक असायचे.
सतत ४९ वर्षे त्यांनी या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर १९५६ साली बौद्ध धर्म स्विकारल्याचे प्रा. मेढे यांनी सांगितले.
 छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन १६५० मध्ये झाले यानंतर सन १८२७ मध्ये महात्मा जोतीबा फुले यांचा जन्म झाला. साधारण सव्वा दोनशे वर्षांनंतरचे महात्मा फुले शिवाजी महाराजांच्या विचार-आचारांवर प्रभावित झाले.त्यांनी त्यांचे अडगडीत पडलेलेे रायगडावरील स्मारक शोधून काढले.
समाजसुधारणेचा वसा हाती घेतला. महात्मा फुलेंचे निधन सन १८९० मध्ये झाले. यानंतर १८९१ मध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला. या तीनही महापुरुषांचा प्रत्यक्षात संपर्क नसला तरी त्यांच्या विचार, आचारांवर त्यांच्यानंतर आलेल्या महापुरुषांनी आपले जीवन सार्थकी ठरविले.
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, सानेगुरुजी यांचा आदर्श ठेवून बाबा आमटे घडले. ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही शिकवण देणार्‍या सानेगुरुजींच्या वर्धा येथील सभेबाबत सांगतांना प्रा. मेढे म्हणाले की, सानेगुरुजींची सभा ऐकण्यासाठी बाबा आमटे नागपूर येथून वर्धा येथे आले मात्र रेल्वे गाडी उशीरा पोहचली. सभा ऐकण्यास मिळाली नाही.
यावेळी सभेनंतर बाबा आमटे हे सानेगुरुजींना भेटण्यासाठी रेल्वेस्थानकावर पोहचले तेव्हाच नेमकी रेल्वे सुरु झाली. यावेळी त्यांनी सानेगुरुजी यांना पाठमोरे पाहुन त्यांची प्रेरणा घेतली. कार्य करत राहिले. त्यांचा चेहरा पाहिला असता तर दुनिया घडविली असती असे अशा प्रकारे चरित्र घडत असल्याचे मत प्रा. मेढे यांनी व्यक्त केले.
 यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना, विचारांना कृतीची जोड द्या. बुद्धीमत्ता, प्रयत्न व पुस्तकांची जोड दिल्यास पुस्तके तुम्हाला उंचावर नेऊन ठेवतील. विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने गुरुजनांपर्यंत पोहचवावी व गुरुजनांनीही त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केेले.
विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांची पुस्तके वाचायला द्या. यामुळे देशातील गुन्हेगारी, अपराध कमी होतील. प्रत्येक विद्यार्थ्यांने वर्षभरात एका महापुरुषाचे पुस्तक वाचण्याचा संकल्प करायला हवा असे आवाहन केले.
 व्याख्यानमालेच्या समारोपीय अध्यक्षीय मनोगत भुसावळ हायस्कूल संस्थाध्यक्ष ए.एन. शुक्ल यांनी केले. प्रास्ताविक अरुण मांडाळकर, सुत्रसंचालन गायत्री सरोदे यांनी तर आभार प्रदर्शन विनोद शेजवळ यांनी केले.

LEAVE A REPLY

*