Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

पाचोरा तालुक्यात टंचाई गडद; जलसाठे निरंक : 12 दिवसाआड पाणी

Share
लक्ष्मण सुर्यवंशी |पाचोरा :  पाचोरा तालुक्यातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्प निरंक व मृतावस्थेत गेल्याने ग्रामीण भाग पाणी टंचाईच्या सावटाखाली आला आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या के.टी.वेअरमध्ये अत्यंत कमी जलसाठा असल्याने 12 दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.

मे मध्ये शहराला महिनाभरात दोन वेळाच पाणी मिळण्याची शक्यता आहे. टंचाईवर मात करण्यासाठी आवर्तनाची गरज आहे. ग्रामीण भागात 11 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 20 गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेतील 13 गावांच्या मागणीनुसार सहा गावांचे प्रस्ताव मंजूर झाले होते, परंतु आचारसंहितेमुळे ही कामे रखडली असून उर्वरित गावांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

विहिरी खोलीकरण व आडवे बोअर करण्यासाठी 20 प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. पैकी सहाच प्रस्ताव मंजूर आहेत. तीन गावांनी नवीन विंधन विहरींची मागणी केली आहे. शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. गुराढोरांना चारा-पाणी मिळेनासा झाला असून पाचोरा तालुका भीषण पाणी टंचाईकडे वाटचाल करीत आहे.

दुर्लक्षामुळे जलसाठे निरंक

पाचोरा तालुका दुष्काळी जाहीर आहे. सरासरीपेक्षा कमी प्रमाणात झालेल्या पावसात मध्यम-लघु प्रकल्प अपेक्षित भरले नाहीत. पिके वाचविण्यासाठी झालेली पाण्याची चोरी, महसूल-पाटबंधारे- वीज वितरण विभागाची पाणीचोरी रोखण्यात हतबलता, महामार्गाच्या कामांकरिता मध्यम प्रकल्पातून पाण्याची उचल, त्यातच कडक उन्हाळा, उष्ण तापमान अश्या अनेक कारणांनी जलसाठे कोरडे व पाण्याविना निरंक झाली आहेत.

आढावा बैठका निरर्थक

उन्हाळा सुरू होताच संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता राजकिय व प्रशासकीय स्तरावर आढावा बैठकांचे सत्र सुरू होते. तालुका दुष्काळी असल्याने महसूल व पंचायत समितीच्यावतीने मोठा आव आणून भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्याकरिता उपाय योजनांच्या बैठका झाल्या. यासाठी कृषी, पाटबंधारे, नगरपालिका, पंचायत समिती, तलाठी, ग्रामसेवक, विज वितरण, पोलीस यंत्रणेसह सर्वच विभागांचे अभियंते, अधिकारी व कर्मचार्‍यांना नेहमीप्रमाणे सक्त आदेशांनव्ये पाचारण करून टंचाई बाबत माहिती घेतली जाते.

या बैठकीत ग्रामीण भागातून अनेक विभागांच्या आकार्यक्षमतेवर ग्रामस्थ पुराव्यासह आरोप व नाराजी व्यक्त करुन संबंधित अधिकार्‍यांना लोकप्रतिनिधींसमोर धारेवर धरतात. यात लोकप्रतिनिधींचाही समावेश असतो. चिंतन- मंथन व कुंथन होते. कामचुकारांवर कठोर कारवाया व निलंबनाचे आदेशही निघतात. श्रेयवादाचे आरोप व राडे होतात. ही सर्व प्रक्रिया पार पडल्या नंतर काही दिवसांनी प्रत्यक्षात कोणावरही कोणत्याच कारवाया झालेल्या दिसत नाही. मागील समस्या कायम असतात.

वीज-पाणी व अन्य मागण्यांची पुतर्ता झाल्याचे अहवाल मिळत नाही. पाणीचोरी थांबत नाही. शासनकर्ते व प्रशासन चालविणारे एकाच माळेचे मणी असल्याने सालाबादा प्रमाणे जनतेला पाण्यासाठी वणवण व भटकंती करावीच लागते. मग या आढावा बैठकींचे फलित काय? हा प्रश्न निरर्थक व अनुत्तरीत ठरल्याचा अनुभव मात्र येतो.

पेयजल योजनांचे फायदे किती?

तालुक्यात मुख्यमंत्री पेयजल योजनेतून सन 2018/19 वर्षात हनुमानवाडी, सारोळा बु, वडगाव अंबे, सारवे पिंप्री या चार गावात 50 ते 60 लाख रुपये खर्चाच्या पेयजल योजनांची कामे सहा महिन्यापासून सूरु आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेतून 60 ते 70 लाख रूपये खर्चाची सन 2013/14 वर्षात मंजूर असलेली मात्र प्रत्यक्षात सन 2017 वर्षात कामे सुरू करण्यात आली. यात नांद्रा, पहाण, वरखेडी, लोहारी व नगरदेवळा गावांचा समावेश आहे. या गावातील ग्रामस्थांना पाणी मिळत असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे म्हणणे आहे.

नगरदेवळ्याच्या योजनेचे काम रखडलेले आहे. अजूनही काही तांत्रिक कामे अपूर्ण असल्याचे अभियंता सांगतात. योजना कामांचे 90टक्के बिले अदा झाली आहे. ही बहुतांश कामे सत्ताधारी पदाधिकार्‍यांनी दुसर्‍यांना पुढे करून घेतल्याने अधिकार्‍यांना काही बोलत येत नाही आणि कारवाया देखील करता येत नाही. वर्षानुवर्षे चालणार्‍या कामांमुळे पेयजल योजनांचा फायदा कोणाला? व कितपत यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो.

पाणी टंचाई पाहता चिंचखेडा खु, खेडेगाव बु, गाळण बु, वेरूळी खु, लासुरे, लोहारी बु, वडगाव प्र.भ., होळ, सांगवी प्र.भ., टाकळी, सारोळा खु, घुसर्डी, लासगाव, वेरूली बु, कुर्‍हाड, नाईकनगर, राजुरी बु, डोंगरगाव, वडगाव बु. या गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. वाणेगाव, निंभोरी, सावखेडा खु- बु, भोरटेक, राजुरी, आंबे वडगाव, खाजोला, लासुरे, शहापुरा व शिंदाड या 11 गावांना दिघी- खडकदेवला, बिलदी धरणातील मृत साठ्यातील विहिरीतून पाणी पुरवठा केला जात आहे. पुढचा काळ भीषण पाणी टंचाईचा आहे.

मे महिन्यात शेतीसह नागरिक, गुराढोरांची पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ आणि लोकप्रतिनिधींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तालुका झपाट्याने पाणी टंचाईकडे वाटचाल करतांना दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!