इंजिनिअर होवून दीपालीने साकारले पित्याचे स्वप्न

0

जळगाव |  प्रतिनिधी :  आपल्या पाल्याने भविष्यात पुढे जावून स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनावे यासाठी प्रत्येक पालकांची मोठी धावपळ असते. मात्र पालक असलेल्या पित्याचे छत्र हरपल्यानंतरही त्यांच्या स्वप्नासाठी धडपडणार्‍या दिपाली बडगुजर या विद्यार्थिनीने इंजिनिअर होवून वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.

मुलांना पालकांकडून मायेची उब मिळाली तर मुले यशस्वी होतांना अनेक चित्रे जगासमोर आहेत. मात्र वडीलांचे छत्र अचानक निघून गेल्यावर अनेकांच्या मनावर मोठा आघात होतो. असाच प्रसंग श्रमसाधना ट्रस्टचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ऍण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाची विद्यार्थीनी दिपाली भगवान पवार (बडगुजर) हिच्यावर १४ ऑगस्ट २०१६ रोजी आला.

वडीलांच्या आकस्मिक निधनामुळे दिपालीसह आई व तीन लहान भावंडांवर दुःखाचा डोंगर कोसळला. इंजिनिअरींग कॉलेजच्या शेवटच्या वर्षासाठी महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेदरम्यान वडील गेल्यानंतर ती परीस्थितीशी सामना करायला पुढे सरसावली. बी.ई. इलेक्ट्रीकलच्या शेवटच्या परीक्षेत महाविद्यालयातून पहिली तर विद्यापिठातून चौथी आल्याने तिच्या वडीलांचे स्वप्न तिने पुर्ण केले.

परिस्थितीशी दोन हात करीत यश गाठले

इंजिनिअरींग कॉलेजच्या शेवटचे वर्ष असल्याने चांगले गुण मिळावे यासाठी कोणत्याही शिकवणीचा आधार न घेता स्वतःच नोटस् काढून दिपालीने अभ्यास पुर्ण केला. याच दरम्यान एक भाऊ दहावीच्या वर्षाला तर दुसरा बारावीला होता. दोघांभावांचा घरीच अभ्यास घेवून उरलेला वेळ स्वतःच्या अभ्यासाला ती देत होती.

विशेष म्हणजे दोघे भाऊ अनुक्रमे ८६ व ६४ टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान घरातील कुटूंबप्रमुखाच्या अचानक जाण्याने दिपालीच्या परिवारावर आर्थिक संकटामुळे चणचण भासू लागताच परिस्थितीचे गांभिर्य ओळखून शहरातील खासगी शिकवणीवर्गातील विद्यार्थ्यांचे पेपर तपासणीचे काम रात्री उशीरापर्यंत जागून तिने केले.

हे सारे करतांना स्वर्गीय वडीलांनी तिच्या करिअरबाबत पाहिलेले स्वप्ने तिला खुणावत होते, वडीलांच्या प्रेरणेनेच काहीही करून इंजिनिअरींगमध्ये लक्षवेधी यश मिळवावे हा संकल्प केला आणि वर्षभर पुर्वनियोजन करून अभ्यासाला झोकून दिले, त्याचीच फलश्रृती म्हणून दिपाली एसएसबीटी महाविद्यालयातून पहिली व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून गुणानुक्रमे चौथी येवून सार्यांच्या कौतूकास पात्र ठरली आहे.

तीच्या खडतर प्रवासात आई सुनिता पवार, मोठे काका राजेंद्र पवार, संतोष पवार, जितेंद्र कोतवाल, समाधान बडगुजर, जगदीश पचलोड, दिपक साळुंखे आदींनी तिच्या भुमीकेस पाठींबा दर्शवित तिचे मानसिक बळ वाढविले.

LEAVE A REPLY

*