ग्रामीण मराठी चित्रपट ‘बंदुक्या’ सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित

0
कासोदा, ता.एरंडोल | वि.प्र. :  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक कार्य संचालनालयाच्या ५४ व्या मराठी चित्रपट महोत्सवात बंदुक्या या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दरवर्षी मराठी चित्रपट महोत्सवाच्या पारितोषिक प्रदान सोहळा आयोजित करण्यात येतो. या वर्षाचा ५४ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपटाचा पारितोषिक वितरण समारोह बांद्रा रेक्लेमेशन म्हाडा मैदान क्र.१ बांद्रा (पश्‍चिम) येथे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांचे हस्ते मराठी ‘बंदुक्या’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचे पारितोषिक मिळाले.

याच बरोबर सर्वोत्कृष्ट कथा राहुल मनोहर चौधरी (जळगाव) उत्कृष्ट संवाद नामदेव पुरकुटे, उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री हे ४ पारितोषिक मिळाल्याचे चित्रपटाचे अभिनेते व निर्माता निलेश राजेंद्र बोरसे हे कासोदा येथे आले असता त्यांनी वरील माहिती दिली.

याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असतांना निलेश बोरसे हे खान्देशातील सिंदखेडा तालुक्यातील व दोंडाईच्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले मंदाणे या ग्रामीण भागातील रहिवासी आहेत.

आता सध्या ते वडील राजेंद्र बोरसे उद्योगपती नाशिक यांचे सोबतच नाशिक येथेच वास्तव्यास आहेत. खान्देशातील युवापिढी चित्रपट निर्मितीकडे वळल्याने खान्देश वासीयांना एकच आनंद वाटतो. म्हणून चित्रपट निर्माण करत असतांना लहान-मोठे चांगले थोडे वाईट प्रसंगानाही तोंड द्यावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

चित्रपट काढल्याप्रसंगी वडिल राजेंद्र बोरसे व आई सौ.प्रतिभा बोरसे यांच्यासह दिगदर्शक राहुल मनोहर चौधरी (जळगाव) चित्रपटातील इतर कलाकारांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

सदर चित्रपटाकडे आपण कसे वळले या बाबतीत विचारले असता निर्माता बोरसे यांनी सांगितले की, अश्या विषयांच्या चित्रपटांना निर्माता मिळणे कठीण असते निर्मिती लवकर तयार होत नाही.

तरी त्या विषयाचे गांभीर्य व आशय समजून एक निर्माता म्हणून ‘बंदुक्या’या मराठी चित्रपटाची निर्मिती केली व प्रथमच चित्रपट निर्मितीत महाराष्ट्र शासनाकडून बंदुक्याला ४ पारितोषिक मिळाल्याने मनस्वी आनंद झाला.

सदर चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मराठी माणसांची ओळख करणारा चित्रपट असल्याचे अभिनेते निर्माता यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*