शालेय पोषण आहार : १५८ मुख्याध्यापकांची कानउघडणी

0

भुसावळ |  प्रतिनिधी :  शालेय पोषण आहाराचा माल चांगल्याप्रतिचा असणे आवश्यक आहे. चांगला मालच पुरवठादाराकडून ताब्यात घ्या. काही शाळांमध्ये माल कोठ्यांमध्ये न साठवता पोत्यांमध्ये पडून असतो. त्यामुळे हा माल खराब होतो. यापुढे कोणत्याही शाळेमध्ये पोत्यांमध्ये शालेय पोषण आहार आढळून आल्यास संबंधित मुख्याध्यापकावर शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा गटशिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण आहार अधिक्षक सुमित्र अहिरे यांनी दिला.

सध्या संपूर्ण जिल्ह्यात गाजत असलेल्या शालेय पोषण आहार या संवेदनशिल विषयावर दि.२६ रोजी येथील पत्री शाळेत मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत खाजगी अनुदानित, न.पा., जि.प. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील १५८ मुख्याध्यापकांची उपस्थिती होती.

व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिमा सानप, विषयतज्ञ देवानंद वाघधरे, केंद्रप्रमुख रविंद्र तिडके, नलिनी झांबरे, संजय श्रीखंडे, सलीम शेख, विलास तायडे, यशवंत धायगुडे उपस्थित होते. सुरुवातीस शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिमा सानप यांनी विशाखा समिती, शाळा व्यवस्थापन समिती इत्यादी समित्यांविषयी माहिती दिली.

मुख्याध्यापकांना सूचना वजा इशारा

पुरवठादाराकडून शालेय पोषण आहाराचा माल निकृष्ट अथवा मुदतबाह्य आढळून आल्यास माल ताब्यात न घेता तत्काळ बदलून घेण्याची कार्यवाही करा. तसेच मागणीप्रमाणेच आवश्यक तेवढाच माल तपासून घ्या.

कोणत्याही परिस्थतीमध्ये शाळेमध्ये एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी लागणारा मालाचा साठा राहणार नाही याची खबरदारी घ्या. जास्त दिवस माल पडून राहिल्यास खराब होतो.

लाभार्थी विद्यार्थी, नोंदवही क्रमांक १ मधील नोंदी व ऑनलाईन नोंदी यात साम्य असावे. खराब किंवा मुदतबाह्य मालाचा शालेय व्यवस्थापन समिती व इतर सदस्य यांच्या समक्ष पंचानामा करुन मालाची विल्हेवाट लावावी. याबाबत वारंवार पत्र देण्यात आले आहे. योग्य कार्यवाही केली नाही तर होणार्‍या परिणामास तुम्ही जबाबदार असाल असा सूचना वजा इशारा अहिरे यांनी दिला.

पर्यवेक्षीय यंत्रणा सज्ज

शालेय पोषण आहार व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रबाबत शासन निर्णय व शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार कार्यवाही करावयाची आहे. शाळांमध्ये त्यासंदर्भात तपासणीसाठी पर्यवेक्षीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. चाचणीबाबत पर्यवेक्षीय यंत्रणेने केलेल्या नोंदी व शिक्षकांनी केलेल्या नोंदी यात तफावत आढळल्यास कार्यवाही होणार आहे.

गैरहजर ४४ मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीसा

सभेस विविध शाळेतील तब्बल १५८ मुख्याध्यापकांची उपस्थित होती. तर ४४ मुख्याध्यापक हजर नव्हते. या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी अहिरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*