Type to search

maharashtra जळगाव

फैजपूरच्या निवडणूक कर्मचार्‍याचा मृत्यु : कुटूंबातील सदस्याला नोकरी द्या

Share

न्हावी, ता.यावल । वार्ताहर :  फैजपूरच्या जे. टी. महाजन तंत्रनिकेतन मध्ये लिपीक असलेले व न्हावी येथील रहीवासी असलेले पंकज गोपाळ चोपडे यांची रावेर लोकसभेच्या निवडणूकीसाठी नियुक्ती झाली होती. दि.22 रोजी निवडणूकीचे साहित्य ताब्यात घेत असतांना चक्कर येवून ते खाली कोसळले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना दि. 23 रोजी त्यांचे निधन झाले.

पंकज गोपाळ चोपडे (वय 35) यांची रावेर लोकसभेच्या निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झालेली होती. मात्र निवडणुकीच्या नियमानुसार त्यांना भुसावळ तालुका मिळाला होता. त्याचप्रकारे त्यांनी ट्रेनिंगचे दोन क्लासही केले होते.  दि.22 एप्रिल रोजी भुसावळ येथे लोकसभा निवडणुकीचे साहित्य ताब्यात घेताना पंकज चोपडे हे चक्कर येऊन खाली कोसळले.

त्यांना उपचारार्थ भुसावळ तहसील कार्यालयातील डॉक्टरला बोलाविले. त्यांनी ताबडतोड त्यांना दुसरीकडे नेण्यास सांगितले, त्यानुसार त्यांना भुसावळ नगरपालिकेच्या दवाखान्यात नेण्यात आले. तेथूनही त्यांना जळगावला सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. परंतु त्यांची सावदा येथील डॉ.अतुल सरोदे यांची ट्रीटमेंट चालू होती म्हणून सावदा येथे अ‍ॅम्ब्युलन्सने आणण्यात आले आणि तेथून जळगावच्या डॉ.मिलिंद वायकोळे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दि.23 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

…तर पंकज यांचा जीव वाचला असता..

तत्पूर्वी निवडणुकीच्या कामाची ऑर्डर मिळाल्यानंतर त्यांनी फैजपुरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना लेखी स्वरूपात – माझे व्हॉलचे ऑपरेशन नुकतेच झाले आहे. त्यामुळे माझी तब्येत नेहमी नाजूक असते. कृपया माझी नेमणूक रद्द करावी असा अर्ज दिला होता. परंतु चोपडे यांना पुन्हा निवडणुकीची आर्डर आल्याने तुम्हाला राखीव ड्युटी करावीच लागेल, असे प्रांताधिकारी यांनी चोपडे यांना सांगितले. त्यावेळी त्यांचे सहकारी जे. टी. महाजन तंत्रनिकेतनचे सागर इंगळे, मिलिंद भोगे व प्रकाश महाजन उपस्थित होते.

घरातील असा एकमेव कमवता मुलगा, कुटुंबाचा आधार अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली वेदिका (वय पाच वर्ष), पूजा (वय दोन वर्ष) असा परिवार आहे. निवडणूक कार्य हे जसं राष्ट्रीय कर्तव्य समजतात, त्याचप्रमाणे प्रशासनाने सुद्धा अशा घटनेसाठी केवळ आर्थिक तरतूद न करता त्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासन सेवेत रुजू करून त्या कुटुंबाप्रती कर्तव्य पार पाडावे, अशी अपेक्षा निवडणुकीनिमित्त काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.

दि.24 एप्रिल रोजी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ.फिरोज तडवी यांनी पंकज चोपडे यांचे शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. दुपारी 4 वाजता त्यांच्यावर साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!