Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

अमळनेरला साडेतीन हजार भाविकांनी केले संत तुकारामांच्या गाथेचे सामुहिक पारायण

Share

अमळनेर । प्रतिनिधी  सद्गुरु संत सखाराम महाराज अमळनेरकर समाधी व्दिशताब्दी सोहळ्यात दि.24 एप्रिल रोजी गाथा पारायण, श्री महाविष्णू पंचायत याग, हवन, पूजा आणि लोककल्याणकारी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. संत सखाराम महाराज संस्थानचे विद्यमान गादीपती प्रसाद महाराज पूर्णवेळ उपस्थित होते. अत्यंत मंगलमय, धार्मिक वातावरणात सुमारे साडेतीन हजारहून अधिक भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

श्री महाविष्णु पंचायतन यागात बुधवारी दुसर्‍या दिवशी 250 यजमान सहभागी झाले. संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक वैदिक विद्वान या यज्ञात सहभागी झाले आहेत. वाराणसी, गोकर्ण, चेन्नई, तिरुपती इत्यादी ठिकाणाहून वेदपाठी विद्वान चतुर्वेद पारायणासाठी आलेले आहेत. कीर्तन मंडपात सकाळी सात ते साडेबारा दरम्यान श्री तुकाराम गाथ्याचे सामुदायिक पारायण झाले. दादामहाराज शिरवळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या गाथा पारायणात स्त्री-पुरुष वाचकांची साडेतीन हजारहून अधिक लक्षणीय संख्या होती.

दुपारी 4 ते 5 नाशिक येथील विद्वान स्मार्तचुडामणी शांतारामजी भानोसे यांचे प्रथम सत्रात तर 5 ते 6 दरम्यान अन्वा येथील ज्ञानेश्वर महाराज चातुर्मासे यांचे व्दितीय सत्रात सुश्राव्य प्रवचन झाले. बीड माजगाव येथून आलेल्या स्वामी अमृताश्रम महाराजांचे सश्राव्य कीर्तन झाले. प्रसाद महाराजांच्या उपस्थितीत भाविकांनी वारकरी हरिपाठ, पावल्या खेळीत केला. टाळ मृदुंगाच्या नामघोषात हरीनामात हा उत्सव दिवसेंदिवस भव्य दिव्य होत आहे. चिन्मयमूर्ति संस्थानचे माधवानंद महाराज व महंत ईश्वरदास महाराज यांची लक्षणीय उपस्थिती होती.

विविध सामाजिक उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिरात माधवराव गोळवलकर गुरुजी स्वयंसेवी रक्तपेढी जळगावव्दारा रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. जळगाव येथील कांताई नेत्रालयाच्या सौजन्याने 700 हून अधिक नेत्र रुग्णांची तपासणी केली गेली. गरजेनुसार ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे अशांना शस्त्रक्रियेसाठी पुढे पाठविले जाईल. दिव्यांगांना साहित्य वाटप करताना 10 सायकलींचे वाटप व वॉकर, काठ्यांचेही वाटप प्रसाद महाराजांच्याहस्ते केले गेले.

सद्गुरु श्री सखाराम महाराजांचा वैराग्य, भक्ती, ज्ञान व परंपरा निर्वाहाचा आग्रह सर्वांना ज्ञात आहेच. संत सखाराम महाराजांचा जन्म, अवतार कार्य व समाधी अमळनेर परिसरात झाले. त्यांचा परमार्थ उत्तर महाराष्ट्रात फळला, फुलला. श्रद्धेय सखाराम महाराजांच्या समाधी व्दिशताब्दी सोहळ्याचा भव्य दिव्य कार्यक्रम 21 एप्रिल पासून सुरू झालेला आहे. या श्रृंखलेत अनेक उपक्रम घेतले जात आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!