वैभवच्या दुसर्‍या हृदयाचीही धक-धक थांबली !

0
पाथरी, ता.जळगाव । दि.25 । वार्ताहर-हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी होऊ लागल्यानंतर प्रथमच पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरून हृदय अवघ्या 1 तास 35 मिनिटांत मुंबईत आणण्यात यश मिळाले होते.
दि. 12 मे 2016 रोजी गुरुवारी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी होवून 14 वर्षीय मुलाला जीवनदान मिळाले होते. त्या ह्दयाची धडधडही काल थांबली.

हृदय प्रत्यारोपणामुळे वर्षभरापूर्वी मृत्युंजयी ठरलेला वैभव ज्ञानेश्वर पाटील (वय15) जळगाव जिल्ह्यातील पाथरी येथील मुळ रहिवासी होता.

बोरीवली येथे राहणार्‍या व पाथरी येथील मूळ रहिवासी असलेल्या वैभवला कार्डिओ मायोपॅथी या हृदयाच्या आजाराने ग्रासले होते.

हृदय प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. चार महिन्यापासून ह्दय प्रत्यारोपणाची तो वाट पाहत होता. दिवसेंदिवस त्याची प्रकृती खराब होत होती. ह्दय प्रत्यारोपणाशिवाय कोणताही पर्याय नव्हता.

28 वर्षीय मुलाचा अपघात झाल्यामुळे पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. अपघातात या मुलाच्या डोक्याला जबर मार बसला होता.

या मुलाला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी हृदय, दोन मूत्रपिंड आणि यकृत दान करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात गेली चार महिने प्रतीक्षा यादीत असलेल्या 14 वर्षीय मुलगा वैभव पाटील यास त्यामुळे हृदय मिळाले.

दि. 12 मे 2016 रोजी मध्यरात्री पुण्याहून रात्री 1 वाजून 38 मिनिटांनी हृदय घेऊन रुग्णवाहिका निघून मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात हृदय 188 किलोमीटरचे अंतर कापून मध्यरात्री 3 वाजून 13 मिनिटांनी पोहोचले.

तत्काळ वैभववर हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. कार्डिओलॉजिस्ट डॉ. अन्वय मुळे यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. मुंबईतील ही 17 वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होती.

पुढचे 48 ते 72 तास महत्त्वाचे होते, तेही वैभवने पार केले. ह्दय प्रत्यारोपणानंतर वर्षभरात त्याचे वजन व उंची वाढली, आता आपला मुलगा संकटातून बाहेर निघाला, असे वाटल्याचे त्याचे वडील ज्ञानेश्वर पांडूरंग पाटील यांनी सांगितले.

इयत्ता 10 वीत तो शिकत होता. मात्र दोन दिवसांपूर्वी सकाळी उठल्यावर तो थरथर कापू लागला. त्याला लागलीच मुंबई येथील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळीही त्याने उपचारांना प्रतिसाद दिला. परंतु, तो घेत असलेल्या औषधींचा संसर्ग झाल्याने प्रत्यारोपण करण्यात आलेल्या ह्दयाची धडधड दि. 24 जुलै रोजी रात्री 1.30 वाजता थांबली.

पाथरी येथे अंत्यसंस्कार
वैभवचे वडिल ज्ञानेश्वर पाटील हे आधी भारतीय सैन्यदलात होते. आता ते मुंबई येथे नोकरीस असून बोरीवली येथे राहतात. आधी त्यांच्या पत्नीचे म्हणजे वैभवच्या आईचे निधन झाले. यानंतर मुलगा वैभवला कार्डिओ मायोपॅथी या हृदयाच्या आजाराने ग्रासले. ह्दय प्रत्यारोपणानंतरही वैभवचा मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह पाथरी येथे आणण्यात आला. यावेळी उपस्थित नातेवाईक व गावकर्‍यांचे डोळे पाणावले होते. मोठा खर्च करुनही मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत होती. वैभववर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

ईच्छा अपूर्ण
ह्दय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर वैभवची पाथरी येथे येण्याची ईच्छा होती, अंथरुणावर असतानाही त्याला गावाची ओढ होती, सावत्र आईने त्याची शेवटपर्यंत काळजी घेतली. परंतु, त्याचा मृतदेह गावी आल्याने आजी-आजोबा, काका, काकू यांनी आक्रोश केला. त्याच्या काकाच्या मुलाने अग्निडाग दिला, तेव्हा स्मशानभूमीत वातावरण अंत्यत शोकाकूल झाले होते.

पहिल्यांदाच पुण्यापासून रस्ते मार्गाने मुंबईत वैभवसाठी हृदय आणले गेले होते. पुणे-मुंबई प्रवास रस्ते मार्गाने प्रवास करण्यासाठी साडेतीन ते चार तासांचा कालावधी लागतो. पण, 150 पोलीस आणि ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर प्रथमच ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता. रस्ता मार्गाने प्रथमच ह्दय आणून ते वैभववर प्रत्यारोपण करण्यात आले होते. वैभवच्या पश्चात आजी, आजोबा, वडिल, सावत्र आई, बहिण, भाऊ, काका, काकू असा परिवार आहे.

 

LEAVE A REPLY

*