Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

वैदिक परंपरेचे श्रेष्ठत्व जपणे आपले कर्तव्य : शंकराचार्य विद्यानृसिंह भारती सरस्वती

Share
अमळनेर । प्रतिनिधी :  आपण सनातन वैदीक परंपरेचे पायीक आहोत, या परंपरेचे श्रेष्ठत्व जपणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी तेज, शुद्धता आणि सात्विकता आपण पाळू या, असे प्रतिपादन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती सरस्वती यांनी केले. अमळनेर येथील सद्गुरू संत सखाराम महाराज अमळनेरकर समाधी व्दिशताब्दी सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी उपस्थित भाविकांशी सुसंवाद साधला.

यावेळी संतव्यासपीठावर, स्वामी गोविंदगिरी महाराज, अखिल भारतीय संत समितीचे मुख्य संचालक श्रीमज्जगद्गुरू रामानंदचार्य श्री हंसदेवाचार्यजी महाराज यांचे उत्तराधिकारी अरुणदासजी महाराज, महामंडलेश्वर महाराज जनार्दन हरीजी महाराज (फैजपूर), गुरुमल्लासिंह महाराज (हरिव्दार), संत सखाराम महाराज संस्थानचे 11 वे गादीपती प्रसाद महाराज, स्वामी नारायण संस्थेचे स्वामी भक्तीप्रसाद शास्त्री, महंत प्रकाशदासजी केशवानंद सरस्वती, वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले (सातारा), हभप दादा महाराज जोशी (जळगाव), गणेश्वर शास्त्रीद्रवीड श्रीक्षेत्र वारानसी, श्री गुरु भक्तराज महाराज मुल्हेरकर, मारोती महाराज कुर्‍हेकर अशा थोर संत महंतांच्या उपस्थितीत शेकडो भाविकांच्या उपस्थितीत. वेदमंत्राच्या उच्चाराने सद्गुरू संत सखाराम महाराज अमळनेरकर समाधी व्दिशताब्दी सोहळ्याचे दि. 21 रोजी औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या औपचारिक उद्घाटनानंतर दिव्यांग व्यक्तींना उपस्थितांच्याहस्ते साहित्य वाटप करण्यात आले व प्रतिकात्मक वृक्षारोपण देखील करण्यात आले.

या सोहळ्यास उपस्थित संत, महंतांचे स्वागत प्रसाद महाराज यांनी स्वागत संत पादुका पूजन, आचार्य पूजनाने केले. दि.21 रोजी अमळनेर येथे सखाराम महाराज वाडी संस्थान परिसरात सकाळी या सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन झाले. वेद मंत्रोच्चार आणि संत सखाराम महाराज की जय या घोषात मान्यवरांच्याहस्ते दीप्रप्रज्ज्वलन, प्रतिमापूजन, ध्वजपूजनाने हे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी संस्थानचे विश्वस्त आप्पा येवले यांनी प्रास्ताविकात व्दिशताब्दी सोहळ्याच्या आयोजनाबाबत सांगितले तर जयंत मोडक यांनी देखील यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. व्दिशताब्दी समाधी सोहळ्याच्या औचित्याने संत सखाराम महाराजांच्या थ्रीडी प्रतिमेचे तसेच चांदीच्या प्रतिमेचे व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. व्दिशताब्दी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेले महा विष्णू पंचायतन यज्ञ दि.22 एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले.

करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती सरस्वती यांनी सखा आणि राम या शब्दाची फोड करून सांगितली. रामाशी सख्य असल्याशिवाय आपण जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. आपणं सनातन वैदीक परंपरेचे पायीक आहोत, या परंपरेचे श्रेष्ठत्व जपणे आपले काम आहे. त्यासाठी तेज, शुद्धता आणि सात्विकता आपण पाळायला हवी. भक्त आणि शिष्य या दोहोंचे वैशिष्ट देखील त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. रामाचे नाम घेण्याची आपली परंपरा आहे तीही जपली पाहिजे असे आवाहनही उपस्थितांना त्यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक गोविंदगिरी महाराज यांनी भाविकांशी सुसंवाद साधला. संत सखाराम महाराज खरोखरीचे महाराज होते. त्यांनी रामानंदीय व वारकरी संप्रदायाचा उत्तम समन्वय साधला. परमेश्वर प्राप्तीसाठी काही सोडावे लागते. संत सखाराम महाराज पायी वारीला जात असत त्यावेळी आपली वाडी येथील राहती झोपडी जाळून मग ते वारीला जात. त्यामुळे त्याग किंवा वैराग्य हा गुण त्यांच्यात होता.

संत सखाराम महाराज संस्थानने कीर्तन, भजन आणि नृत्याची परंपरा कायम राखलेली आहे. मानवी जीवनाची दिशा संतांनी दाखविलेल्या मार्गाने वाटचाल करायला हवी असे आवाहन गोविंदगिरी महाराज यांनी केले. सोहळ्यासाठी उभारलेल्या मंडपाला वादळाचा तडाखा बसला, परंतु 48 तासात पुन्हा यज्ञ मंडप आणि अन्य कार्यक्रमाचा मंडप उभारला गेला. विशेष म्हणजे यज्ञकुंडाला धक्काही लागला नाही किंवा जीवीत हानी झाली नाही ही संत सखाराम महाराजांची कृपा, असे प्रसाद महाराज म्हणाले.

अखिल भारतीय संत समितीचे मुख्य संचालक श्रीमज्जगद्गुरु रामानंदचार्य श्री हंसदेवाचार्यजी महाराज यांना या सोहळ्यासाठी बोलाविले होते परंतु अपघातात साकेतवासी झाले त्यांची आठवण देखील यावेळी काढली गेली. श्री गुरु भक्तराज महाराज मुल्हेरकर यांच्यासह उपस्थित संत, महंतांनी सुसंवाद साधला. संत सखाराम महाराज संस्थानचे राजेंद्र भामरे यांनी आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!