जळगाव विमानतळाजवळील मन्यारखेडा शिवारात भडकला ‘वणवा’

0

जळगाव / औरंगाबाद महामार्गावरील रस्त्यावर असलेल्या जळगाव विमानतळाच्या मागील बाजुस असलेल्या मन्यारखेडा शिवारात अचानक लागलेल्या आगीमुळे हजारो हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाल्याची घटना घडली.

रात्री 9 वाजेपासून लागलेली आग रात्री 1.15 वाजेपर्यंत सुरु होती. मनपा, जैन इरिगेशनच्या अग्निशमन विभागाला आग विझविण्यात अपयश आले. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव विमानतळाच्या मागील बाजूस मन्यारखेडा शिवार असून रात्री अचानक याठिकाणी वणवा पेटल्याने आग लागली.

वाळलेले गवत आणि हवेमुळे आग वाढतच होती. या आगीत हजारो हेक्टर वनक्षेत्र जळुन खाक झाले.

आगीने रौद्ररुप धारण केल्याने विमानतळाच्या मागील बाजुस असलेल्या गेट नं.3 पर्यंत आग आल्याने गस्तीवर असलेल्या अधिकार्‍यांने त्या ठिकाणाहून पळ काढला.

मन्यारखेडा शिवारातील संपुर्ण वनक्षेत्राला आगीने वेढा घातल्याचे चित्र होते. आगीत वाळलेल्या गवतासह हिरवेगार वृक्षही होरपळत होते. यावेळी विमानतळाचे अधिकारी सत्यजित बिर्‍हाडे यांच्यासह सुरक्षारक्षक उपस्थित होते.

यावेळी एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी देखील घटनास्थळी भेट दिली होती.

अग्निशमन विभागाचे शर्थीचे प्रयत्न
आग विझविण्यासाठी मनपाच्या महाबळ अग्निशमन विभागाचा एक बंब व जैन इरिगेशनचा एक बंब असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

परंतू हवेमुळे आग आटोक्या न आल्याने रात्री उशिरापर्यंत अग्निशमन विभागाचे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते.

अग्निशमन विभागाचे कर्मचारी बचावले
आगीवर नियंत्रण मिळाविण्यासाठी मनपाच्या अग्निशमन विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते.

याचवेळी हवेमुळे आगीने रौद्ररुप धारण केल्याने अग्निशमन विभागातील कर्मचारी सोपान जाधव हा आगीत अडकला होता.

याचवेळी पुन्हा आग भडकल्याने आग अग्शिमन बंबापर्यंत पोहचल्याने चालक लनी जोसेफ व राजेंद्र रानवडे यांनी गाडी खाली उडी घेवून आपला जीव वाचविला.

वनविभागाचे अधिकारी अनभिज्ञ
मन्यारखेडा शिवारात लागलेल्या आगीत हजारो हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले तरी रात्री उशिरापर्यत वनविभागाचा एकही अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी आलेला नव्हता.

यावेळी विमानतळ येथील अधिकार्‍याने वनविभागाशी संपर्क साधला असता वनविभागाचे अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

*