कर्जमाफीचे अर्ज न मिळाल्याने संभ्रम

0
जळगाव । दि.24 । प्रतिनिधी-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात शेतकरी कर्जमाफी योजनेचे अर्ज आज प्रशासनाने ठरवुन दिलेल्या केंद्रांवर उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान जिल्ह्यासाठी 2 लाख अर्जांची छपाई झाली असुन तांत्रिक अडचणींमुळे उद्या दि. 25 पासुन ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरवात होणार असल्याचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी आजपासुन अर्ज भरण्याला सुरवात होणार होती. मात्र महाऑनलाईनसह बहुतांश सीएससी सेंटरवर अर्जच उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांमध्ये कर्जमाफीविषयी पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

मात्र जिल्हा प्रशासनाने कर्जमाफीचा लाभ शेतकर्‍यांना देण्यासाठी 2 लाख अर्ज छापले असुन ते वि.का. संस्थांना वितरीत करण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

तसेच शासनाने आपले सरकार, सीएससी सेंटर, महाऑनलाईन सेवा, या केंद्रांवर शेतकर्‍यांचे अर्ज भरून घेतले जाणार आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नसुन शेतकर्‍यांनी विका संस्थांकडे दिलेले अर्ज भरून द्यावयाचे असल्याचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात 1744 केंद्र
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात महा ऑनलाईनची 177, सी.एस.सी. एस.पी.व्ही.ची 700 तर आपले सरकार वेब पोर्टलची 869 अशी एकुण 1744 केंद्र उपलब्ध आहे. अर्ज भरण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असले तरी ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांनाही अर्ज दाखल करता येणार आहे.

व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या सुचना
राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी व्हीडीओ कॉन्फरसींगद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधुन कर्जमाफीसाठी मार्गदर्शक सुचना देत अर्ज भरून घेण्याचे आदेश दिले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निबंधक, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, महा ऑनलाईनचे स्वप्निल पाटील, सी.एस.सी.एस.पी.चे राहुल देवरे आदि उपस्थित होते.

जिल्ह्यातील तालुका उपनिंबंधकांनाही अर्ज
जिल्हा सहकार विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व तालुका उपनिबंधकांना प्रत्येकी 1 हजार अर्जांचे वितरण केले जाणार असुन शेतकर्‍यांचे अर्ज आणि यादी मागविण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी सांगितले.

उपनिबंधकसह जिल्हा बँकेत स्वतंत्र कक्ष
कर्जमाफीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासह जिल्हा बँकेत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असुन त्याठिकाणी कर्मचार्‍यांची नेमणूक करून त्यांच्याकडून प्रत्येक दिवशी अर्जांची माहिती घेतली जाणार असल्याचेही उपनिबंधक जाधवर यांनी सांगितले.

 

 

 

LEAVE A REPLY

*